तुंगी-रायगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : १९६५ फुट
श्रेणी : मध्यम
सह्याद्रीच्या कुशीतील काही किल्ल्यांची इतिहासातील ओळख हरवल्याने त्यांच्या नावाच्या व स्थानाच्या बाबतीत काहीसा गोंधळ झालेला दिसुन येतो. नावाच्या व स्थानाच्या या गोंधळामुळे अपरिचित राहिलेले असेच एक टेहळणीचे ठिकाण (किल्ला?) आपल्याला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पहायला मिळते. टेहळणीचे स्थान असलेला हा डोंगर आता तुंगी किल्ला म्हणुन ओळखला जातो. आता या डोंगराचे मान्यवरांच्या पुस्तकात येणारे उल्लेख पाहुया. गोनीदांच्या किल्ले या पुस्तकात त्या वेळच्या कुलाबा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीत तुंगी किल्ल्याचे नाव येते पण पदरगड किंवा कलावंतीण महाल नाव येत नाही. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला तुंगी किल्ला नेमका कोणता हे कळत नाही. पण बहुदा तो पदरगड असावा. यानंतर श्री. आनंद पाळंदे हे आपल्या दुर्गवास्तु या पुस्तकात पदरगड या किल्ल्याचा उल्लेख तुंगी नावाने करतात. या शिवाय तुंगी किल्ल्याचा तिसरा उल्लेख पुण्याचे सचिन जोशी लिखित रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव या पुस्तकात येतो. यात तुंगी व पदरगड हे दोन वेगवेगळे किल्ले असुन तुंगी व पदरगड यामध्ये असलेल्या खिंडीतून तुंगी शिखरावर जाण्याची वाट असल्याचे लिहिले आहे.
…
मुळात तुंगी शिखर हे पदरगड पासुन बऱ्याच अंतरावर असुन त्यावर जाताना कोणतीही खिंड लागत नाही त्यामुळे सचिन जोशी लिहितात तो तुंगी किल्ला नेमका कोणता हा संभ्रम मनात निर्माण होतो. हे सर्व प्रश्न मनात घेऊनच मी तुंगी शिखराची (दुर्ग?)वारी केली व जे दिसले ते येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुंगी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कर्जत स्थानक गाठावे लागते. येथुन कर्जत-खांडस असा मार्ग असुन या वाटेवर कशेळे गाव पार केल्यावर खांडस आधी पाथरज नावाचे गाव आहे. कर्जत पाथरज हे अंतर साधारण २५ कि.मी.आहे. पाथरज गावातील नदीपुल पार केल्यावर एक लहान पण पक्का रस्ता २ कि.मी. अंतरावरील डोंगरपाडा गावात जातो. या गावातुन तुंगी किल्ल्याखाली असलेल्या तुंगी गावात जाण्यासाठी कच्चा गाडीरस्ता असुन पावसाळा वगळता जीपसारखे वाहन या रस्त्याने तुंगी गावापर्यंत जाते. इतर वाहनांनी या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. तुंगी किल्ल्यावर जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. खाजगी वाहनाने थेट डोंगराच्या पायथ्याशी गेले असता डोंगराचा पायथा ते तुंगी गाव हे अंतर २ कि.मी.असुन रस्ता चढाचा असल्याने तुंगी गावात जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. तुंगी गाव साधारण ५० घरांचे असुन गावात चौथी पर्यंत शाळा आहे. गावात मुक्काम करायचा असल्यास या शाळेत राहता येईल व विनंती केल्यास घरगुती जेवणाची देखील सोय होईल. गावातुन एक मळलेली वाट तुंगी किल्ल्यावर गेलेली असुन वाटाड्या न घेता सहजपणे किल्ल्यावर जाता येते. गडमाथ्यावर जाणारी वाट निमुळत्या सोंडेवरून गडावर जात असुन या सोंडेवर फारशी सपाटी दिसुन येत नाही. मातीची वाट पार केल्यावर कातळवाटेवरून जाताना कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे खळगे दिसुन येतात. कातळावरील हि वाट काही प्रमाणात पायऱ्यायासारखी कोरलेली वाटते. या वाटेने वर गेल्यावर डावीकडे कड्याच्या काठावर कातळात कोरलेले एक टाके पहायला मिळते. हे टाके पाहुन सरळ पुढे गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे सहा-सात खळगे असुन यातील एका खळग्यात ध्वजासाठी खांब रोवलेला आहे. माथ्यावर सहासात माणसे बसु शकतील इतपत जागा असुन या ठिकाणाहुन खुप मोठा प्रदेश नजरेस पडतो. हे शिखर पदरगड व कोथळीगड यांच्या मध्यभागी असुन मुख्य डोंगररांगेपासुन बरेच लांब आहे. माथ्यावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष नसले तरी मुख्यत्वे टेहळणी व संदेश देण्यासाठी या शिखराचा वापर केला जात असावा.
© Suresh Nimbalkar
पुढे वाचा…
चलचित्र पहा