तंदूरी पनीर टिक्का मसाला

By Snehal's Kitchen Corner Recipe 2 Min Read
तंदूरी पनीर टिक्का मसाला

तंदूरी पनीर टिक्का मसाला –

साहित्य:
तंदूरी पनीर टिक्का: २०० ग्रॅम पनीर, ३ चमचे दही, अर्धा चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा फिश/चिकन मसाला, १ चमचा कांदा लसूण मसाला, १ चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ.

ग्रेव्ही: ३-४ कांदे, ४-५ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, ½ टोमॅटो, ½ ढोबळी मिरची, १ चमचा दही, ३ चमचे चिकन मसाला, ३ चमचे लाल तिखट, २ चमचे कांदा लसूण मसाला, तेल, मीठ, पाणी

कृती:

तंदूरी टिक्का
१. प्रथम एका बाऊलमध्ये दही, हळद, लाल तिखट, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी आणि मीठ एकत्र करून घ्यावे. नंतर पनीरचे तुकडे (थोडे मोठेच) त्यात कोट करून घ्यावेत. एक कोळसा गॅस वर गरम करून घ्यावा आणि कोळसा बाउलमध्ये ठेऊन त्यावर १ चमचा साजूक तूप घालावे आणि बाउल वर पटकन झाकण ठेवावे. अशाप्रकारे पनीरला मस्त स्मोकी फ्लेवर येईल. त्यानंतर ३० मिनिटे मॅरीनेट करावे.

२. एक Pan घेऊन त्यावर थोडे तेल टाकावे आणि पनीरचे तुकडे थोडे भाजून (गोल्डन ब्राऊन) घ्यावे.

अशाप्रकरे आपले पनीर टिक्का तयार.

ग्रेव्ही :
१. प्रथम ३-४ कांदे चिरून ते कढईमध्ये गोल्डन ब्राऊन होईल पर्यंत भाजून घ्यावेत. नंतर त्यात लसूण आणि आले टाकून गॅस बंद करावा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे.

२. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.

३. कढईमध्ये २ मोठे चमचे तेल घेउन त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे (५ मिनिटे मिडीयम आचेवर). त्यात चिकन मसाला, लाल तिखट, कांदा लसून मसाला घालून परत ५ मिनिटे तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे.

४. नंतर त्यात २ चमचे दही (पनीर मॅरीनेट करून उरलेले दही घातले तरी चालते) घालावे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची घालून पून्हा थोडे परतून घ्यावे.

५. आता आपण आधी तयार करून ठेवलेला पनीर टिक्का (भाजलेले पनीर चे तुकडे) घालावा.

६. आवश्यक वाटल्यास अर्धी वाटी पाणी घातले तरी चालेल आणि भाजी पुन्हा ५ मिनिटे अधून मधून परतून मंद आचेवर भाजी शिजवून द्यावी.

नंतर सर्व्हिंग बाउलमध्ये गरमागरम सर्व्ह करावी. वरतून क्रीम किंवा कोथिंबीर घालून गार्निश करावी.

अशाप्रकारे आपला तंदूरी पनीर टिक्का मसाला तयार!

– स्नेहल काळभोर

Leave a Comment