सुभाष बावनी ४९ | मिशन मॅन –
“ह्या ह्या कानांनी मी अनंत वेळा जो आवाज भरगच्च सभांमधून गरजतांना ऐकला आहे, तोच आवाज नैमिषारण्यातल्या त्या पडक्या शिवमंदिरात पडद्याच्या आडून ऐकला. बाकी तुम्ही काहीही म्हणा, पण ते सुभाषबाबूच आहेत याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका उरलेली नाही.”
अनुशीलन समितीचे ते भूतपूर्व कार्यकर्ते अतुलदांचा दावा ऐकून अवाक झाले.
“कुणाला तरी खात्री करायला पाठवलं पाहिजे”
“कुणाला?”
“पवित्र मोहन रॉय! आझाद हिंद सेनेचे इंटेलिजन्स ऑफिसर! सध्या आमदार आहेत.”
“ठीक आहे”
१९६२ च्या एका प्रसन्न सकाळी रॉय नैमिषारण्यात उतरले. भेट होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागली, पण भेट झाली. मध्ये पडदा होताच!
“बाबा मी पवित्र मोहन रॉय कलकत्त्याहून आलोय. आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही आमचे…”
“इंटेलिजन्स ऑफिसर! बरे आहात ना? १९४४ मधील त्या धुमश्चक्रीत पाणबुडीत स्वार झाल्यावर सुखरुप पोचलात ना भारतात?”
“ने..? ने..?”
“नाही ऑफिसर! आता ते नाव विसरायचं. यापुढे तुम्ही कधीही मला त्या नावाने संबोधायचं नाही.”
“आमच्यासाठी काय ऑर्डर्स आहेत? आम्ही तुमच्याकरता काय करू शकतो?”
“माझ्यासाठी? नाही ऑफिसर. वंगमातेसाठी! भारतमातेसाठी! जगन्मातेसाठी! तुम्हाला भारतात आल्यावर खूप त्रास सहन करावा लागला हे मला माहित आहे. माँ कालीच्या कृपेनेच तुम्ही जिवंत राहिलात; पण थांबता येणार नाही. बरीच कामं करायची आहेत.”
“आपण सांगाल तसं करू.”
पुढे लवकरच पूर्व पाकिस्तानात धामधूम सुरू झाली. जननायकाच्या रूपात शेख मुजीबुर रहमान क्षितिजावर उभे राहिले.
‘तुम्ही मला एकी द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो’ भरगच्च सभेत मुजीबुर रहमान यांचा आवाज टिपेला चढू लागला. ‘जॉय बांगला’ च्या घोषणांनी ढाक्याचा आसमंत दुमदुमू लागला. लोकांना या घोषणांचं नातं ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ आणि ‘जय हिंद’ या आजाद हिंद सेनेच्या घोषणांशी जाणवू लागलं.
ढाक्यात त्रैलोक्यनाथांच्या घरी मुजीबुर रहमान यांच्या गुप्त मसलती चालल्या असताना रस्त्यावरून एक भणंग फकीर सारख्या चकरा मारत होता. तोंडाने काहीतरी बडबडत होता. शेवटी कंटाळून मुजीब त्याच्यावर ओरडले,
“आता जातोस इथून का बोलावू आमच्या मुक्तीबाहीनीच्या माणसांना? सांग तुझ्या याह्याखानाला जाऊन, आता आम्ही तुम्हा रावळपिंडीच्या भुतांना घाबरणार नाही म्हणावं!”
“मुजीब अरे तुम्हाला शत्रुचे गुप्तहेर आणि आपले शुभचिंतक ओळखता येत नाहीत; तुम्ही काय स्वतंत्र बांगलादेश निर्माण करणार आणि काय राज्य चालवणार?”
“बाबाजी तुम्ही? या ना! आत या! आत्ता आम्ही तुम्ही सांगितलेल्या योजनेबद्दलच बोलत होतो.”
“चालू दे तुमचं. मी निघतो, सॅम माझी वाट पाहत असेल.”
“नीट लक्ष देऊन ऐक सॅम! तू कधी जेसोरचा किल्ला पाहिला आहेस का? मी तुला सांगतो- ईशान्येला बलूच रेजिमेंटची बरॅक आहे. त्याखाली आहे शस्त्रांचा प्रचंड साठा. पूर्वेकडे अधिकाऱ्यांच्या राहण्याची जागा आहे. ईशान्येला पठाण रेजिमेंट आहे. त्याखाली तलावासारखा प्रचंड तेलसाठा आहे. वायव्येला आहे एक पळवाट! ती दाबून धरली तर किल्ला तीन दिवसात घेता येईल!”
बरोबर चौथ्या दिवशी- सात डिसेंबर १९७१ ला भारतीय सैन्याने पाकी सैनिकांना जेसोरमधून पिटाळून लावलं. सॅम माणेकशा आत्मविश्वासाने गरजले, “खूप उशीर व्हायच्या आत शस्त्र खाली ठेवा पाकिस्तान्यांनो! तुमच्या नशीबाचा फैसला झाला आहे!”
भारतीय सैन्याच्या पराक्रमाने आणि विद्युतगतीच्या हालचालींनी भारताने युद्ध जिंकलं. पाकिस्तानचा तुकडा पडला. पण मुजीबुर रहमानला कैद झाली. जग म्हणतंय मुजीबुर मेला; बांगलादेशातली जनता म्हणते मुजीबुर मेला; स्वतः मुजीबला वाटलं आता आपण मेलो; तेवढ्यात कुणा अज्ञात बाबाच्या दूतांनी मुजीबला सोडवून आणलं.
बांगलादेशचा पहिला पंतप्रधान बनलेल्या मुजीबुर रहमानचे शब्द होते- “बांगलादेशची निर्मिती हेच नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असल्याचं प्रमाण आहे!”
झालं! राज्यकर्त्यांना सिंहासनं डळमळीत होत असल्याचा भास होऊ लागला. तगडा प्रतिस्पर्धी राखेतून जिवंत होऊन आपल्याला खुर्चीवरून ओढून काढतो आहे, अशी स्वप्नं पडू लागली.
“बाबा आता तरी लोकांसमोर या! आता तर शासकांनाही वाटू लागलंय तुम्ही जिवंत आहात म्हणून!” पवित्र मोहन रॉय अजीजीने म्हणाला.
“वाटू लागलंय? अरे ते तर जाणूनच आहेत मी जिवंत आहे ते. फक्त ठावठिकाणा माहीत नाही म्हणून, नाही तर केव्हाच मला अमेरिकेच्या हवाली केलं असतं त्यांनी”
“पण लोक तुमच्या बाजूने उभे राहतील”
“कुठले लोक? एवढी जर कळकळ असती ना, तर शौलमारीची पहिली बातमी आल्याबरोबर तिथे जनसागर लोटला असता. तसं झालं नाही. माझं बाहेर येणं कुणाच्याच फायद्याचं नाही, अगदी आपल्या देशाच्याही! मी बाहेर येण्याचा अवकाश! भारतावर चहू बाजूंनी दडपण यायला लागेल. जर त्यांना विरोध केला, तर लष्करी, आर्थिक अशा सर्वच बाजूंनी आपल्या देशाची कोंडी करतील ते. आता कुठे स्वतंत्र झालाय आपला देश, उभा राहायचा प्रयत्न करतोय, तो पुन्हा विनाशाच्या गर्तेत ढकलला जाईल. नको बाबा नको! ‘माणसांच्या बलिदानानेच राष्ट्र उभं राहतं’ असं म्हणतो नं आपण? हे आत्ता कळतंय की काहींचं बलिदान मृत्यूनंतर होतं तर काहींचं जिवंतपणी!
“पुन्हा कधीही असा हट्ट घेऊन मला भेटायला येऊ नका! मी इथे सुखात आहे. समर गुहालाही सांग; माझ्या बाहेर येण्याचा अट्टाहास सोडून दे म्हणावं! जा!”
बाबाजी उठून उभे राहिले. धुवाधार पावसात फाटलेल्या छतातून थेंब टपकत होते. आपलं दैन्य लपवण्यासाठी म्हणून की काय, पण त्या थेंबांच्या तालावर पायातल्या खडावांचा आवाज करत हा यतिचक्रवर्ती अंधार्या खोलीकडे निघाला होता. पवित्रला फक्त आवाज ऐकू येत होता.
क्रमशः सुभाष बावनी ४९ | मिशन मॅन –
(फोटो सौजन्य- चित्रपट गुमनामी)
ग्रंथ सूची:
१) Conundrum: Subhash Bose’s life after death- Anuj Dhar
© अंबरीश पुंडलिक