AHMEDNAGAR KOT

By Bhampak Articles 4 Min Read
श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३९

AHMEDNAGAR KOT

TYPE : CITY FORT

DISTRICT : AHMEDNAGAR

HEIGHT : 0

 

 

महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर. सीना नदीच्या काठावर वसलेले हे शहर पुण्यापासून १२० कि.मी. तर मुंबईपासुन २५५ कि.मी. अंतरावर असुन महाराष्ट्रातील अनेक शहरांना रस्ते तसेच लोहमार्गाने जोडलेले आहे. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये बहामनी साम्राज्याची पाच शकले झाल्यावर त्यातील मलिक अहमदशहा बहिरीने स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याने मे १४९० मध्ये सीना नदीकाठी भिंगार गावाजवळ एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी करून आपली जुन्नर येथील राजधानी येथे स्थलांतरित केली. तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका शहराची निर्मिती झाली. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन निजामशहाची राजधानी बनले व अहमद निजामशहाने त्या शहरास आपले नाव दिले. हे शहर म्हणजेच आजचे अहमदनगर. सुरवातीच्या काळात हे शहर कोटबाग निजाम म्हणुन ओळखले जात असे. त्याकाळी या कोटबाग निजामची कैरो,बगदाद शहरांसोबत होणारी तुलना पहाता या शहराचे वैभव लक्षात येते. त्याकाळी हे संपुर्ण शहर तटबंदीच्या आत वसलेले होते व शहरात प्रवेश करण्यासाठी अनेक वेशी होत्या. अहमदनगर शहराचे वैभव केवळ या तटबंदीच्या आत नसुन बाहेर देखील विस्तारलेले होते.

तत्कालीन अनेक भव्य वास्तु केवळ कोटातच नसुन बाहेरील परीसरात देखील दिसुन येतात. तत्कालीन अहमदनगर शहराचे वैभव दर्शविणाऱ्या फराह बाग, चांदबीबी महाल,बाग रोझा,हत्ती तलाव यासारख्या एकापेक्षा एक सरस वास्तु आपल्याला शहराच्या आसपास पहायला मिळतात. या वास्तुच्या भव्यतेपुढे अहमदनगर शहराभोवती असणारा कोट, त्यातील भव्य वेशी व त्यांचे दरवाजे या सर्व गोष्टी विस्मरणात गेली आहेत. वाढत्या शहरीकरणाने या संपुर्ण तटबंदीचा घास घेतला असुन ती जवळपास पुर्णपणे नष्ट झाली आहे पण त्यातील काही वेशी व दरवाजे मात्र आजही शिल्लक आहेत. अहमदनगर शहराची भटकंती करताना मला दिसलेल्या दोन वेशींची मी येथे नोंद घेतलेली आहे व ऊर्वरीत वेशींची माहीती मिळाल्यावर ती माहीती देखील या लेखात एकत्रित करीन. यातील पहिला दरवाजा आपल्याला अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात पहायला मिळतो. अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदीराजवळचा हि वेस असल्याने फारशी शोधाशोध न करता आपण या मंदीराजवळ पोहोचतो. दगडी बांधणीतील हा दरवाजा दोन भक्कम बुरुजात बांधलेला असुन हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. दरवाजाच्या तसेच बुरुजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सध्या हा दरवाजा लोखंडी जाळी लाऊन बंद करण्यात आला असुन बुरुजाशेजारून ये-जा करण्यासाठी नवा रस्ता बांधण्यात आला आहे. दरवाजा बंद असल्याने त्याच्या आतील भागात एका चौथऱ्यावर महात्मा जोतीबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा बसविताना आतील बाजुस संगमरवरी लादी बसवुन दरवाजाच्या मूळ बांधकामात बदल करण्यात आले आहेत. दरवाजा समोर असलेल्या गणपती मंदीरात आपल्याला अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणेशाची साधारण ११ फुट उंच मुर्ती पहायला मिळते. या दरवाजापासुन साधारण १ कि.मी.अंतरावर सर्जेपुरा भागात कोटाचा दुसरा दरवाजा असुन हा दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. हा दरवाजा शहराच्या उत्तर दिशेला असल्याने याला दिल्ली दरवाजा नाव दिले गेले असावे. या दरवाजाशेजारी देखील कधीकाळी बुरुज असावे पण काळाच्या ओघात ते पाडले गेले असुन आता दरवाजाच्या एका बाजुस पक्की इमारत तर दुसऱ्या बाजुस मोठ्या वाहनांसाठी वाहतुकीचा रस्ता बांधण्यात आला आहे. या दरवाजाच्या कमानीतुन आज देखील लहान वाहनांची ये-जा सुरु असते. या संपुर्ण दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन दरवाजाच्या एका बाजुस पहारेकऱ्याना रहाण्यासाठी खोली तर दुसऱ्या बाजुस दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी बंदीस्त जिना आहे. दरवाजाची लाकडी दारे नष्ट झाली असली तरी त्याची दगडी बिजागरे आजही शिल्लक आहेत. दरवाजाच्या आसपास काही फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटलेली आहेत. माळीवाडा दरवाजा व दिल्ली दरवाजा हे दोन दरवाजे पाहण्यास एक तास पुरेसा होतो.

© Suresh Nimbalkar

पुढे वाचा…


WATCH VIDEO

GALLERY

 

WM-2c

 

WM-3c

 

WMc

 

WM-5c

 

WM-4c

 

WM-1c

Previous
Next