अनिश्चिततेचा काळ –
जीवनातील अनिश्चिततेचा काळ हा सर्वात भयंकर असतो कारण त्या काळात बुध्दी, शक्ती आणि आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्याच गोष्टी दिशाहीन होतात. जवळ सर्वकाही आहे पण दिशाच नाही त्यामुळे अस्वस्थता खूप वाढते. आपल्या भोवतालच्या परस्थितीनुसार आपल्याला आपली दिशा ठरवायची सवय लागलेली आहे, त्याचा हा परिणाम आहे.
परस्थितीनुसार बदलणे हा माणसाचा स्वभाव आहे आणि परस्थिती कधीच स्थिर नसते, ती कायम अस्थिरच असते कारण ती आपल्या हातात नसते म्हणून तर तिला परस्थिती म्हणतात. आपल्या हातात असते ती ‘आत्मस्थिती’ ती आपली वैयक्तिक असते आणि ती कायम स्थिर असते. आपण आत्मस्थितीत जाण्याचा आणि राहण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, त्यामुळे आपल्या जीवनात हा अनिश्चिततेचा भयंकर काळ येतो. आपणच अस्थिर स्थितीत असलो तर जीवनातील छोट्यात छोटे वादळही आपल्याला उध्वस्त करू शकते आणि मग आपणच बोंबलत बसतो की त्यावेळची परस्थितीच तशी होते , त्याला मी काय करू शकतो?
जे आत्मस्थितीत स्थिर असतात , त्यांच्याही जीवनात संकटे, अडचणी येतात, पण _ते स्वतः आतून स्थिर असतात , त्यामुळे मोठ्यात मोठ्या वादळातही ते डळमळत नाही. विश्वमाऊलींच्या जीवनात आईवडीलांचा वियोग, वाळीत टाकणे, शुध्दीपत्र मागणे, ही संकटे सामान्य नव्हती, तरीही परस्थिती त्यांच्यात कोणताही बदल करू शकली नाही.
माऊली म्हणतात,
सकळही गोत माझे पंढरीशी जाण ।
बापरखुमादेवीवरू श्री विठ्ठलाची आण ।।
संत तुकाराम महाराजांच्या जीवनात* बायको आणि मुले दुष्काळात अन्नान्न करून मेल्याचे दारूण दुःख आहे. कोणत्याही कर्त्या पुरूषाला आपली पत्नी आणि मुले अन्नावाचून मरण्याचे दुःख अनुभवणे सामान्य गोष्ट नाही .
तरीही तुकोबाराय म्हणतात,
बरे झाले बाईल मेली ।
देवे माया सोडविली ।।
ही आत्मस्थितीत स्थिर असलेल्या महात्म्यांची स्थिती आहे, परस्थिती कशीही येऊ द्यात त्यांच्यात बदल होत नाही . आज आपल्यालाही या स्थितीची गरज आहे covid आपल्या जीवनात आज अनिश्चिततेचा काळ सुरू आहे . ⁉️काय होईल⁉️ कोणालाच सांगता येत नाही यालाच अनिश्चिततेचा काळ म्हणतात.
परस्थिती आपल्या हातात कधीच नसते, तिच्यानुसार बदलणे सोडून द्यावे लागेल आणि आपल्या आत्मस्थितीत स्थिर झाले पाहिजे त्यासाठी बाहेर बघणे सोडून द्यावे लागेल आणि आत स्वतःत पहायची सवय लावली पाहिजे. हे आत स्वतःत पाहणे म्हणजे साधना करणे होय . साधनेचा संबंध सर्वप्रथम आत्मस्थिती आणि आत्मज्ञानाशी आहे आणि नंतर परमात्म्याशी आहे . आजच्या अनिश्चिततेच्या काळात याची प्रत्येकाला नितांत गरज आहे.
डॉ . आसबे ल.म.