शांततेचा काळ | A time of peace

bhampak-banner

शांततेचा काळ | A time of peace –

जीवनात काही काळ असा येतो की आपल्याला शांत रहावे लागते. कर्तुत्ववान आणि क्रियाशील माणसाला शांत राहणे खूप जड जाते कारण हा काळ वाया जातोय असे त्याला वाटत असते , पण हा शांततेचा काळही तयारी करण्यासाठी सत्कारणी लावता येतो आणि तसा तो लावता आला पाहिजे , हीच शूराची ओळख आहे.

औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर शिवरायांसारखा कर्तुत्ववान योध्दा सलग चार वर्षे शांत राहिला होता. आपण त्यांच्या लढाया आणि धडाडी पाहतो , पण त्यांना शांत रहावा लागलेला काळ आपल्याकडून नेहमी दुर्लक्षित होतो. महाराजांसारख्या अखंड उद्योगी माणसाला तो काळ किती कठीण गेला असेल⁉️

इतिहास पहा त्या चार वर्षात महाराजांनी आपल्या स्वराज्याचा मूलखी कारभार सुधारला , सिंधूदूर्ग व रायगड यांची कामे पूर्ण केली आणि सेनेची अशी तयारी केली की औरंगजेबाला पूरंदरच्या तहात दिलेले तेवीस किल्ले फक्त चारच महिन्यात महाराजांनी पुन्हा ताब्यात घेतले . औरंगजेबाला एक टेकडीवजा रामशेज किल्ला ताब्यात घ्यायला सात वर्षे लागली. यावरून महाराजांना नाईलाजाने शांत रहावे लागलेल्या काळाचा किती सदुपयोग केला होता याची कल्पना येते. विशेष म्हणजे तेथून पुढे महाराजांच्या जीवनात एकही पराजय नाही आणि एक क्षणही शत्रू त्यांना थांबवू किंवा अडकवू शकला नाही. राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय या त्यानंतरच्या इतिहासातील सूवर्णाक्षरांनी लिहिलेल्या घटना आहेत .

आज आपल्याही जीवनात नाईलाजाने शांत राहण्याचा काळ आला आहे, उद्योगी , व्यवसायिक , स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी , शेतकरी अशा अनेक घटकांच्या जीवनातील हा कसोटीचा काळ आहे . या वेळेकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले तर हा काळही {lockdown} वाया जाणार नाही.

शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा शांती नंतरचा काळ हा योध्याच्या जीवनातील ‘अजिंक्य काळ’  ठरलेला आहे. पांडवांचा बारा वर्षांचा वनवास हा असाच काळ आहे , पण त्या काळातही त्यांनी तयारी केली आणि अशक्य असलेली कुरूक्षेत्रावरील लढाई जिंकली. प्रभूरामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवासाचा काळ असाच आहे , त्यानंतर त्यांनी रावणावर विजय मिळविलेला आहे .

Lockdown आपल्याही जीवनात हा पुन्हा कधीही न हरण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक लढाईत निर्णायक विजय मिळविण्यासाठी मिळालेला काळ आहे, असे समजा व हा काळ तयारी करण्यासाठी सत्कारणी लावा. कोणताही काळ अनुकूल करून घेणे हे शूराचे लक्षण आहे.

डॉ.आसबे ल.म.

Leave a comment