असामान्याची परीक्षा

bhampak-banner

असामान्याची परीक्षा –

जगातील कोणतेही असामान्य काम, सामान्य माणसाला सत्य वाटत नाही कारण सामान्य माणसाच्या विचारांच्या मर्यादा, दृष्टिकोनाच्या मर्यादा, मनाच्या मोठेपणाच्या मर्यादा संकुचित असतात.

प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या अनुभवावरून जगाला मोजत असतो. आपले अनुभव, आपल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या क्षमतेनुसार येत असतात. आपल्या बुद्धीला आणि शक्तीला सत्संगतीचा संस्कार झाला असेल, तर येणारे अनुभव सकारात्मक असतात आणि कुसंगतीचा संस्कार झाला असेल, तर येणारे अनुभव नकारात्मक असतात.

जगातील कोणतेही असामान्य काम, हे सुरुवातीला सामान्य व्यक्तीकडूनच घडत असते. त्या असामान्य कामामुळे त्या व्यक्तीला असामान्यत्व प्राप्त होत असते. जन्मतः वेगवेगळ्या परिस्थितीत आपला जन्म झाला असला तरी, आपण सर्व सामान्यच असतो. सामान्यातून असामान्याचा प्रवास, हा असामान्य कर्तृत्वारून आणि कार्यावरूनच ठरत असतो.

आपल्याला आपले कार्य आणि कर्तुत्व असामान्य ठरवत असले, तरी मिळवलेले असामान्यत्व टिकवणे अतिशय अवघड असते कारण अवतीभवती सर्वसामान्य माणसेच असतात. अशा असामान्य माणसाला यासाठी आपल्या जीवनात भरपूर त्याग करावा लागतो. त्याचे प्रत्येक पाऊल, हे काळजीपूर्वक पडावे लागते, ही काळजी असामान्य प्रतिमा जपण्याची असते.

जग सुरुवातीला सामान्य माणसावर हसत असते, टिंगल करत असते. हा काळ संपला, की त्याच्या कामाची जर एखाद्याच्या प्रतिमेशी स्पर्धा होत असेल, तर त्याला विरोध होतो.

विरोधाचा काळ संपला, की जग मौन धारण करते कारण जगाला त्याच्या कार्याचे काही देणे घेणे नसते. मौनाचा काळ संपला, की जग त्याचा स्वीकार करते. स्वीकार केल्यानंतर बऱ्याच काळानंतर जग अशा असामान्य माणसाला भरभरून सहकार्य करते आणि डोक्यावर घेऊन नाचते. या सर्व टप्प्यातील प्रवास, हा सामान्य माणसाला निःस्वार्थी वृत्ती, सय्यम, धैर्य, वैराग्य आणि त्याग यांच्या चौकटीतच करावा लागतो.

सामान्य माणसाच्या चारित्र्यावर तिळा एवढा डागही समाज सहन करत नाही. सोन्याला जसे तापून, तप्त होऊन शुद्ध व्हावे लागते, तुपाला जसे कडवून घेऊन शुद्ध व्हावे लागते, तसे असामान्य माणसाला आपले जीवन सोन्यासारखे अमुल्य बनवायचे असेल, तर त्याला समाजाची अग्निपरीक्षा द्यावीच लागते. तुपासारखे शुद्ध व्हायचे असेल तर समाजाच्या सर्व निकषांमध्ये त्याला स्वतःला कडवून घ्यावेच लागते, यात कोणताही शॉर्टकट नाही.

जैसा निर्वातिचा दिपू l सर्वथा नेणे कंपू ll
तैसा  स्थिर बुद्धी स्वरूपु l योग युक्त ll

डॉ. आसबे ल. म.

Leave a comment