स्वीकारणे आणि सोडणे –
आपल्या जीवनात योग्य वेळी काही गोष्टी स्वीकारता आल्या पाहिजेत आणि काही गोष्टी जाणीपूर्वक सोडता किंवा त्यागता आल्या पाहिजेत. बहुतांशी लोकांना स्वीकारणे जमते परंतु सोडणे किंवा त्याग करणे जमत नाही, अशा माणसांचे जीवन कधीच आणि कशानेही समाधानी होत नाही. आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मिळकत म्हणजे शांती आणि समाधान आहे. या दोन गोष्टी मिळत नसतील तर आपल्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. या दोन्ही गोष्टी विकत मिळत नाहीत, तर त्या फक्त सोडण्याने किंवा त्यागाने मिळतात.स्वीकारणे आणि सोडणे.
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे l राहे समाधाने चित्ताचिये ll
करील तो काय नोहे महाराज l परी पाहे बीज शुद्ध अंगी ll
विवाहापूर्वी म्हणजेच ब्रह्मचार्य आश्रमात ज्ञानार्जन, बलोपासना, कला या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि व्यसन, व्यभिचार या गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे. तारुण्यात या गोष्टी सोडता आल्या नाहीत, तर जीवन नरक बनल्याशिवाय रहात नाही.
गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर जबाबदारी, कर्तुत्व, पराक्रम, शौर्य, धाडस, स्वावलंबन, पवित्र यांचा स्वीकार करता आला पाहिजे, तरच आपले चरित्र तयार होत असते.
आपल्या मुलांना मिळवून ठेवलेल्या धनापेक्षा आपले चरित्र दिशा देत असते आणि सन्मार्गाला लावत असते. गृहस्थाश्रमात जी माणसे या गोष्टी विसरतात, त्यांना त्यांच्या मुलांची चिंता आयुष्यभर राहते कारण यांच्या मुलांना आपला बाप आदर्श आहे, असे कधीच वाटत नाही.
ज्यांचे चारित्र्य, कर्तुत्ववान, पवित्र आणि शुद्ध असते अशाच लोकांचे चरित्र तयार होत असते. गृहस्थाश्रमात ,
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे l उदास विचारे वेच करी ll
उत्तमचि गती तो एक पावेल l उत्तम भोगील जीव खाणी ll
अशा पद्धतीचा आचार असावा लागतो.
सर्वकाही मिळवूनही त्यात आसक्त राहू नये. कर्तुत्ववान, धनवान, रूपवान आणि पराक्रमी पुरुषाच्या जीवनात त्याचा हेवा आणि आकर्षण वाटणाऱ्या अनेक रंगीबेरंगी गोष्टी त्याच्या जीवनात येतात, यांचा त्याग करायला फार मोठी ताकद लागते. ज्यांना आकर्षित होऊन वेड लागण्याची वेळ येते अशा गोष्टी कितीही क्षणिक आनंद देणाऱ्या असल्या तरी केवळ अपवित्र आहेत म्हणून त्याचा त्याग करण्यात खरा पुरुषार्थ आहे.
ज्या व्यक्तींना या भूलभुलैयांचा त्याग करता येतो त्यांचे चरित्र तयार होत असते आणि तेच आदर्श ठरत असतात. वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्या जीवनात वैताग जाऊन वैराग्य आले पाहिजे. या काळात वैतागाचा त्याग करून वैराग्याचा स्वीकार केला पाहिजे, तरच वृद्धापकाळाकडे झुकू लागलेले शरीर आणि मन तृप्त रहात असते. अशा काळात आपले शरीर आणि बुद्धी सक्षम असली तरी, संसाराची जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवता आली पाहिजे.
मुलांच्या आचरणाचा भरवसा नसेल, तर अधिकार आणि हक्क आपला असावा, परंतु त्याचा विस्तार मुलांच्या हाती असावा. अशा काळात आपण मुलांना फक्त मार्गदर्शन करण्यापुरते आपले मत व्यक्त करावे. त्यांच्या कामात कोणतीच ढवळाढवळ करू नये. मुले चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना दाखवून द्यावी. त्यांना पटले नाही, तर अनुभवातून त्यांना ते समजल्याशिवाय रहात नाही.
अशी दिशा देण्यामुळे वानप्रस्थी लोकांची एखाद्या दिशादर्शक ताऱ्याप्रमाणे इज्जत आणि उंची राखली जाते, यालाच महातारा किंवा महातारी म्हणतात. या काळात वैताग त्यागून वैराग्य स्वीकारता आले नाही, तर अशा लोकांची फक्त *महातऱ्हा* होते.
वेळ क्रोधाचा उगविला l अवघा योग वाया गेला ll
ऐसे कळले उत्तम l जन तेचि जनार्धन ll
ही अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. धर्मशास्त्रात सुचविल्याप्रमाणे आपल्याला हे जमले नाही, तर फक्त आपल्या जीवनातीलच शांती आणि समाधान गायब होते, असे नाही, तर आपल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडल्याशिवाय रहात नाही. आयुष्यभर संसारात आसक्त राहिलेल्या माणसाला, हे सोडणे जमत नाही, म्हणूनच आज प्रत्येक घरात वाद आहे.
जीवनातील शेवटचा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम आहे. या काळात फक्त त्याग जीवनात असला पाहिजे. ज्याला संपूर्ण त्याग जमतो त्याच्या जीवनात परमात्म्याचा योग घडतो. सर्वस्वाचा त्याग, हाच जीवनातील शांती आणि समाधानाचा पाया आहे.
जोपर्यंत आपण जीवनातील काही गोष्टी मनात पकडून ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत त्याचा त्रास आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही. मी व माझे हेच जीवनातील सर्व दुःखाचे मूळ आहे, याचा त्याग करणे किंवा ही भावना सोडून देणे सर्वात कठीण आहे. त्यामुळे जीवनातील अंतकाळी तरी आपल्याला हे सोडता आले पाहिजे.
मी माझे ही आठवण विसरले जयाचे अंतःकरण l पार्था तो संन्यासी जाण निरंतर ll
प्रत्येक दिवसाची सुरुवात मी आज काय स्वीकारायचे आहे⁉️ आणि काय सोडायचे आहे ⁉️ याचा हिशोब करून करता आली पाहिजे, तरच आपल्याला शांती आणि समाधानाची जागा सापडणार आहे. धर्मशास्त्रात सांगितलेले चारही आश्रम आपल्याला तत्वानुसार जगता आले, तर जीवनात एकही प्रश्न शिल्लक रहात नाही, यालाच परिपूर्ण जीवन असे म्हणतात आणि यासाठीच आपला जन्म आहे.
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार