प्रवाहाच्या विरोधात –
प्रवाहाच्या विरोधात उभे रहाला ताकद लागते आणि त्याच्या विरोधात प्रवास करायला त्यापेक्षाही जास्त ताकद लागते. अशी प्रवाहाच्या विरोधात उभी राहणारी माणसे आणि प्रवाहाच्या विरोधात प्रवास करणारी माणसे समाज लक्षात ठेवतो आणि इतिहासात त्याची नोंद होते. प्रवाहाबरोबर वाहणारी माणसे, काळाच्या प्रवाहाबरोबर त्यांचे अस्तित्व वाहून जाते आणि नेस्तनाबूत होते.
भगवंताने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घालताना, सर्व काही देऊन, परिपूर्ण अवस्था दिलेली आहे. त्याच्या देण्यामध्ये कोणताही भेदभाव नाही, मग आपण जन्माला येऊन सार्थ काय केले ? हा प्रश्न प्रत्येकाने सतत स्वतःला विचारला पाहिजे.
जन्मा आलो त्याचे l आजी फळ झाले साचे ll
तुम्ही सांभाळले संती l भय निरसली खंती ll
आपण जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचे फळ ठरवले पाहिजे, ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्यानुसारच आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लावला पाहिजे. असे सूत्रबद्ध जीवन ज्या व्यक्तीचे असते, त्याचे अस्तित्व निर्माण होत असते.
समाजधारणा ही नेहमी सुखासीन असते. फारसे कष्ट न करता, जे चालले आहे, ते ठीक आहे, अशा अवस्थेतच माणसे जगत असतात आणि शेवटी मरत असतात. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,
जन्मा आला हेला आणि कसातरी जगून मेला l
जीवन अमूल्य आहे, आपल्याला त्याची किंमत वेळेवर कळाली, तर आपल्या जगण्याचेही सोने होते. आज देश आर्थिक दृष्ट्या रसातळाला चाललेला आहे, बेकारी वाढत आहे, भ्रष्टाचार वाढत आहे, गुन्हेगारी, व्याभिचारी वृत्ती यांचा तर महापूर आलेला आहे, निसर्ग कोपला आहे, रोगराई वाढलेली आहे, या प्रवाहात येईल ते सहन करत बहुतांशी समाज जगत आहे. या प्रवाहाच्या विरोधात खंबीरपणाने ताठ उभे राहणे आणि परिस्थितीशी दोन हात करणे, हा खरा पुरुषार्थ आहे.
मी स्वतःसाठी जगत जगत, माझ्या राष्ट्राचा आणि समाजाचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील काही भाग हा राष्ट्रासाठी आणि समाजासाठी राखीव ठेवून, दान केला पाहिजे. हा प्रवाहाच्या विरोधातील प्रवास आहे. माझेच भागत नाही आणि मी दुसऱ्याला काय देऊ शकतो ? ही विचारसरणी प्रवाहाबरोबर वाहत जाणारी आहे.
आपला कोणालातरी आधार वाटणे, यासाठी आपण खंबीरपणाने ताठ उभे असलो पाहिजे. आज आपल्याला ही संधी प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा हा सर्वात अनुकूल काळ आहे. प्रतिकूल काळातच आपल्या शौर्याची गरज असते आणि प्रतिकूल काळच आपल्या शौर्यासाठी आणि कर्तुत्वसाठी सर्वात अनुकूल असतो.
यावनी सत्तेच्या वरवंट्याखाली भरलेला समाज, शिवरायांच्या जन्माच्या वेळची प्रतिकूलता होती. माँसाहेब जिजाऊंनी आणि राजे शहाजींनी प्रवाहाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले आणि शिवरायांना प्रवाहाच्या विरोधात पोहायला लावून त्यांना अजरामर केले.
चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा l आवश्यक तो सेवक येर वावगी खटपट ll
आपली गणना नेहमी अशा विरळा एखादा, यामध्ये व्हावी, यासाठी अखंड प्रयत्न करावा.
डॉ. आसबे ल.म.