अलक

By Bhampak Story Sameer Khan 3 Min Read
अलक

अलक –

(अलक हा कथाप्रकार मी पहिल्यांदा लिहिलाय. या आधी दिर्घ कथा लिहील्या होत्या.)

१) गेल्या ४५ दिवसांपासून त्यांच्या रहिवासी भागात करोनामुळे सक्तीचं  लाॅक डाऊन असल्यामुळे तो घरातच कैद झाला होता. आज रात्री चे ३ वाजले तरीही त्यास झोप येत नव्हती. घरातील किराणा, अम्मीची औषधे,सुटलेला रोजगार, उद्यापासून सुरू होणारा रमझान असंख्य प्रश्न त्यास पोखरत होते. त्याने सभोवार नजर फिरवली. त्याचा दोन वर्षांचा चिमुकला त्याचा हात घट्ट धरून गाढ झोपला होता. तो लहानपणी अब्बुजवळ असाच निर्धास्त झोपायचा हे आठवून त्याच्या गालावर दोन टपोरे अश्रू तरळून गेले.

२) रमझानचा पहिला ऊपास होता. पहाटे सहेरी कशीबशी ऊरकली गेली. संध्याकाळी मात्र ईफ्तार साठी काहीतरी करणं भाग होतं. घरातल्या सर्वांना परिस्थिती चांगलीच ठाऊक असल्याने दस्तरख्वान वर जितकं होतं तितकंच घेऊन बसले होते. आज तर खजूर ही नव्हती की कसलाच गोड पदार्थ नव्हता. निराश मनाने त्याने दुवासाठी दोन्ही हात आभाळाकडे ऊचलले आणि भरलेले डोळे गच्च बंद केले तोच शेजारच्या काकू गरमागरम गोड शिरा घेऊन हसतमुखानेच आत घरात आल्या. आज पुजा  होती त्यांच्याकडे. जजाकल्लाह म्हणत त्याने तो शिरा तोंडात घातला आणि ऊपास सोडला.

३) तो नेहमीच पुर्ण रामलीलाचे कपडे शिवून देत असे. त्यांचा पिढीजात व्यवसायच होता तो. अब्बु , अम्मीसहीत भक्तीभावाने रामलीलाही पहायला जात असे. यावर्षी मात्र तो तोंड पाडून टीव्ही वरच्या “ताजा खबरे ” पहात निराश बसला होता. तितक्याच पंडितजींनी येऊन नेहमीच्या कामांची अॅडव्हांस रक्कम दिली. त्याने हसतच या बातम्यांमध्ये “राम” नाही म्हणत टीव्ही बंद केला.

४) ” कट्टर धार्मिक ” माणसांमुळे देशाला निर्माण झालेला धोका या विषयावर भाषण देऊन आजवरच्या सर्वात मोठ्या जनसमुदायास आपल्या पक्षात सामील करण्याच्या खुशीत प्राध्यापक साहेब परतत होते. आता मंत्रीपद नक्की झाले होते. येतांना गाडीस जबर अपघात झाला. शेकडो कार्यकर्ते ICU बाहेर जमा झाली. सरांचा रक्तगट दुर्मिळ होता. शहरात तर उपलब्ध नव्हताच पण बाहेरून मागवण्यात वेळ वाया जाणार होता. या रक्तगटाचा एकमेव रक्तदात्याला चाचरतच डाॅक्टरांनी फोन लावला. पुढच्या दहा मिनिटांत तो हजर झाला. त्याने रक्त दिले. सर धोक्यातून वाचले. असंख्य कार्यकर्त्यांनी तो बाहेर पडतांना कृतज्ञतेने हात जोडले. दवाखान्याच्या शेवटच्या पायरीवर आल्यावर त्याने खिशातली ‘ जाळीदार गोल टोपी ‘ काढली व डोक्यात घालून नमाजला गेला. कार्यकर्ते पाठमोर्‍या त्यास पाहतच राहीले.

(अलक हा कथाप्रकार मी पहिल्यांदा लिहिलाय. या आधी दिर्घ कथा लिहील्या होत्या. कुठल्याही धर्म, समुदाय यांना दुखावण्याचा हेतू नाहीये. याला केवळ साहित्य म्हणून पहावे ही विनंती काही चुकले असल्यास आधीच क्षमस्वः)

कॉपीराईट © समीर खान

Leave a comment