अमेय श्रीखंडे मुलाखत

bhampak post

अमेय श्रीखंडे मुलाखत –

अमेय श्रीखंडे ! एक ‘ Complete Sportsman’. खूप उशिरा सुरुवात करूनही भरपूर मेहनत घेतली की कमी वेळातही यशस्वी होता येते याचे एक उत्तम उदाहरण. त्यांचा गरवारे महाविद्यालयातून सुरु झालेला हा क्रिकेटचा प्रवास ते महाराष्ट्र रणजी ट्रॉफी आणि नंतर IPL मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून मिळालेली संधी यासाऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी मुलाखतीच्या मार्गाने केलेला छोटासा प्रयत्न.अमेय दादा आपल्यापेक्षा वयाने जेमतेम १०-१२ वर्षे मोठा असेल. पण अगदी Friendly आणि हसतमुख असे व्यक्तिमत्व. त्यामुळे मुलाखातीपेक्षा गप्पाष्टक सत्र म्हणणे जास्त उचित राहील असे मला वाटते. असा हा दादा आपल्याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.

तुमचे शिक्षण कुठे झाले?
माझे सगळे शिक्षण पुण्यातलेच. शालेय शिक्षण महाराष्ट्र मंडळ आणि पुढे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे आपल्या एम.ई.एस. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधलेच.

मग क्रिकेट मध्ये करियर करायचे कधी ठरविले?
खरेतर मी professionally खेळायला खूप उशिरा सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजेच १२ वीत असताना professionally खेळायला लागलो. त्याआधी क्रिकेट खेळायचो पण ते गल्ली क्रिकेट, नुसतं क्रिकेट असं. १० वी पर्यंत मी पूर्ण blank होतो. माझ्यासमोर जसजसे पर्याय येत गेले, जसजसं मला वाटत गेलं त्याप्रमाणे मी प्रगती करत गेलो आणि मग डेक्कन जिमखाना क्लब join केला. कारण खेळात करियर करायचं असेल तर क्लब join करणे खूप महत्त्वाचे असते.

तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही खेळाची आहे का? आणि त्यांचा कसा पाठिंबा मिळत गेला?
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी ही खेळाची नाही. माझ्या कुटुंबातील मी पहिलाच खेळाडू आहे. कुटुंबाचा खूप पाठिंबा होता. पण सामने खेळून वर्तमानपत्रात जेव्हा नाव यायला लागले, थोडे पैसे मिळत गेले तसतसा त्यांचा पाठिंबा हा वाढतच गेला.

या क्षेत्रात तुमचे प्रेरणास्थान कोण आहे?
खरेतर या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे प्रेरणास्थान कोणीच नव्हते. मला आवड होती म्हणून मी क्रिकेटकडे वळलो. आजही प्रेरणास्थान असं कोणी नाहीये, पण मला विराट कोहली वाटतो.

तुमचे मार्गदर्शक कोण होते?
मी डेक्कन जिमखाना मध्ये खेळायचो. त्यामुळे तिथले मार्गदर्शक हेमंत आठवले त्यांनी मला क्रिकेटचे मार्गदर्शन दिले. शिवाय ते महाराष्ट्र क्रिकेट रणजी संघाचे selector ही होते.

तुम्ही कॉलेजकडून खेळला होतात का? तेव्हा कॉलेजचा संघ होता का?
कॉलेजचा संघ होता आणि मी कॉलेजकडून सलग तीन वर्षे खेळलो. प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष. तेव्हा आमचा संघ खूप co-operative होता. उमेश भेलके, दीपक पोटे, उमेश देवधर हे माझे मित्र होते. आम्ही सगळे क्रिकेट आणि त्याव्यतिरिक्तच्या वेळातही खूप मज्जा करायचो.

तुमच्या क्रिकेटच्या प्रवासाविषयी थोडक्यात सांगा ना !
माझा प्रवास हा थोडा उशीराच सुरु झाला. जानेवारी २००४ मध्ये खेळायला सुरुवात केली आणि नोव्हेंबर २००४ सालीच State level U-१९ खेळलो. मग तिथूनच रणजीसाठी निवड झाली. बऱ्याच खेळाडूंसोबत खेळायला मिळालं, त्यांच्याकडून शिकायला मिळालं.मी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली,केली युवराज सिंग, राहुल द्रविड लक्ष्मीपती बालाजी यांसारख्या खेळाडूंसोबत खेळलो. धोनीनेही मला सल्ला दिला, की खेळाची मजा घे आणि कोणताही ताण न घेता खेळ. त्यापुढे रणजी मध्ये मी ३ वेळा शतके, एकदा १५० धावा केल्या. तसेच नंतर IPL मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स कडून खेळलो. आणि हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे!

शिक्षण आणि क्रिकेट सामने आणि सराव याच्या वेळा कशा जुळवायचा?
यासाठी महाविद्यालयाने मला खूप मदत केली. बरेचदा मी सामन्यांमुळे बाहेर असायचो. शिवाय बरेचदा मैदानावर देखील असायचो. त्यामुळे तासांना बसणे शक्य होत नव्हते. पण माझी आकलन शक्ती चांगली होती आणि नशीब पण चांगले होते. त्यामुळे आदल्या दिवशी अभ्यास करून सुद्धा उत्तीर्ण होत गेलो.

तुमची रणजी सामन्यांसाठी निवड कशी झाली ? रणजी पदार्पण कसे होते ?
डेक्कन जिमखानामध्ये माझा खेळ चांगला होता. माझ्यातलं कौशल्य बघून माझी रणजीसाठी निवड झाली. रणजी पदार्पण अजूनही आठवते. महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा सामना होता. तो सामना रत्नागिरीमध्ये झाला आणि त्या वर्षीच्या रणजी मोसमातील तो शेवटचा सामना होता. त्यात मी केवळ १६ च धावा करू शकलो. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच सामान्यामध्ये मी १९५ धावा केल्या.

प्रत्येक वेळेस यश मिळतेच असे नाही, पण अपयशातूनही खूप काही शिकता येत असा प्रसंग कधी आला का?
असे प्रसंग तर खेळात सारखेच येत असतात. त्यासाठी संयम खूप महत्त्वाचा असतो.

Professional करियर आणि क्रिकेट सध्या कसे जमविता?
मी सध्या आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून आहे. मी कामाचे तास संपले की संध्याकाळी ४ ते ७ सराव करतो. कुठे सामने असतील तर विभागही मला परवानगी देतो. तसेच मी आयकर विभागाकडून देखील खेळतो.

खेळाचे/ शारीरिक शिक्षणाचे जीवनातील महत्त्व काय आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करता?
खेळामुळे फिटनेस वाढतो. शारीरिक फिटनेस बरोबरच मानसिक फिटनेस राखला जातो. खेळामुळे आपण Relax राहतो. तसेच आयुष्यात येणारे चढ आणि उतार कसे हाताळायचे हे खेळामुळे कळते. यासाठी मी रोज ३ तास खेळतो. क्रिकेट बरोबरच Badminton ही खेळतो. तसेच रोज १ तास सकाळी किंवा संध्याकाळी जिमला सुदधा जातो.

क्रिकेट व्यतिरिक्त अजून कोणते खेळ तुम्ही खेळता?
सध्या मी क्रिकेट बरोबरच Badminton, football, carrom सुदधा खेळतो. पण मला सगळेच खेळ खेळायला आवडतात. त्यामुळे जो खेळ खेळावासा वाटेल तो खेळतो.

हे सगळं झालं क्रिकेटबद्दल ! पण महाविद्यालयीन जीवनातील आठवणी/ गमतीजमती नक्की असतील, त्याबद्दल काहीतरी सांगा ना!
महाविद्यालायामध्ये मला खूप मित्र-मैत्रिणी होत्या आणि आजही आम्ही संपर्कात आहोत. आम्ही तास बुडवून बरेचदा तापडियामध्ये असायचो, फिरायला जायचो आणि हे नाही तर महाविद्यालयातल्या Pavilion मध्ये नक्की असायचो.

तुमचं सध्याचं Job profile काय आहे? त्यात वाणिज्य शाखेचा कसा उपयोग होतो?
मी आता आयकर विभागात आहे. तिथे सगळं वाणिज्य शाखेचंच आहे. आयकर परीक्षेला Accounts, taxation हेच विषय होते. थोडं उच्च स्तराचे होते. पण पाया पक्का असल्यामुळे ते सोप्पं गेलं.

तुमच्या करियरमध्ये महाविद्यालयाची कितपत भूमिका आहे?
महाविद्यालयाने मला खेळण्यासाठी freely allow केलं. मला कधी कोणती बंधने घातली नाहीत. आपटे सरांनी पण खूप मदत केली, म्हणून मी मोकळेपणाने खेळू शकलो. तसेच महाविद्यालयाचे खूप सहकार्यदेखील लाभले.

तुम्ही जे स्वप्न मनाशी बाळगले होते ते पूर्ण झाले असे वाटते का?
नक्कीच! मी आत्ता क्रिकेटमुळे खूप समाधानी आहे. मला आता खूप लोक ओळखतात. मला क्रिकेटने दिला, मला क्रिकेटने एक प्रकारचा मान दिला. क्रिकेटने मला जीवनात भरपूर काही शिकवलं, आज माझे जीवन हे क्रिकेटमुळेच आहे आणि मी आता म्हणू शकतो कि मी ‘Complete Sportsman’ आहे. अजूनही मी खेळतो आहे आणि पुढेही खेळणार आहे.

तुमचे ‘भविष्यातील नियोजन’ काय आहे?
मला अजूनही क्रिकेट खेळायचं आहे आणि मी खेळतो आहे. मला रणजी बरोबरच आंतरराष्ट्रीयही खेळायचं आहे. त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत. अजून २-३ वर्षांनी मार्गदर्शनामध्ये पडण्याचा विचार आहे. त्यात जे कौशल्य आणि नवीन काही गोष्टी आहेत ते शिकवायला नक्की आवडेल. तसेच आयकर विभागातही करियर आहे. सध्या मी आयकर इन्स्पेक्टर आहे. शिवाय ITO परीक्षा उत्तीर्ण झालोय, मी आता ऑफिसर होईन, नंतर commissioner ! तर असं साधारण नियोजन आहे.

जे विद्यार्थी खेळात करियर करू इच्छितात, त्यांना काय सांगावेसे वाटते?
खरेतर प्रत्येकाने compulsory एक तरी खेळ खेळावा. तुम्ही तो खेळ खेळला ना तर तुम्हाला आयुष्य जगता येतं, खेळ तुम्हाला उत्साह देतो, तुमच्या दैनंदिन जीवनात नवीन चैतन्य आणतो, एक freshness येतो. त्यामुळे तुम्ही शिक्षणाला तेवढंच महत्त्व द्या पण त्याच्याच जोडीला खेळही खेळा. कदाचित करियर नाही करता आले तरी ‘Balanced Life’ हे खेळ शिकवतो, असे मला वाटते.

खरेच! थोड्याच वेळात दीर्घ प्रवासाविषयी सगळेच नाही पण खूप काही जाणून घेता आले. रणजी ट्रॉफीबरोबरच अमेयदादा ला मार्गदर्शनाकडेही वळायचे आहे आणि आयकर विभागातही मोठी उंची गाठायची आहे. अमेयादादाला या पुढच्या वाटचालीला आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा!

– स्नेहल काळभोर

Leave a comment