स्वतःला विसरून जाण्याची कला माणसाला अवगत असायला हवी…
स्वतःला विसरून जाण्याची कला माणसाला अवगत असायला हवी. स्वतःला विसरणारा माणूसच दुसऱ्याचा मनापासून विचार करू लागतो आणि त्यातूनच दुसऱ्यासाठी चांगले काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण होते आणि अंतःकरण आपोआप निःस्वार्थी बनत जाते . असे निःस्वार्थी अंतःकरण जे करेल ती शुध्द सेवा असते आणि जे देईल ते शुध्द दान असते, जीवनाचे साफल्य हेच आहे.
हे स्वतःला विसरणे खूप अवघड आहे आणि याचे नाटक करता येत नाही . स्वतःचा विचार आणि स्वतःच्याचा विचार माणसाला मरेपर्यंत सोडत नाही, त्याचे कारण आशा आणि पाश आहेत . आशा स्वतःसाठी असते आणि पाश स्वतःच्याचे असतात . या दोन्ही गोष्टी व्यसनापेक्षा भयानक आहेत कारण या माणसाला कधीच माणूस बनू देत नाहीत . जो माणूसच बनत नाही तो माणूसकीने वागू शकत नाही आणि माणूसकीला सोडून केलेली कृती सेवा होऊच शकत नाही .
आपल्या वृत्तीचा विषय संसार आणि भोग आहे , तो नारायण व्हायचा असेल तर आशा आणि पाश सुटावेच लागतात . एकदा वृत्तीचा विषय नारायण झाला की दृष्टी आपोआप व्यापक होते आणि त्यात विश्व सामावण्याची क्षमता निर्माण होते . मग आपली वैयक्तिक आवड आपोआप लोप पावते आणि जगाच्या कल्याणाचा विचार सुरू होतो .
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
देह कष्टविती परोपकारे ।।
हे स्वतःला विसरल्याचे खरे लक्षण आहे .
जोपर्यंत मी आणि माझे याची जाणीव आपल्यात आहे तोपर्यंत आपण पूर्ण क्षमतेने समाजाची, देशाची, धर्माची आणि निसर्गाची सेवा करू शकत नाही. मी आणि माझे याची जाणीव माणसाला अंग राखून काम करायला भाग पाडते, त्यात संपूर्णपणे झोकून देण्याचा अभाव असतो म्हणून ते अपूर्ण असते .
मी माझे ही आठवण । विसरले जयाचे अंतःकरण ।।
पार्था तो सन्यासी ।
जाण निरंतर ।।
आयुष्यात जमेल तेवढी सेवा करू, दान करू पण किमान त्यावेळी तरी स्वतःला पूर्ण विसरून करू . सेवा करताना फोटो काढावासा वाटला की मी शिल्लक आहे असे समजावे, त्यात सत्यही नसते आणि नारायणही नसतो.
– डॉ . आसबे ल. म.