असा मी असामी

By Bhampak Book Review 2 Min Read
असा मी असामी

असा मी असामी –

पुस्तक: असा मी असामी
लेखक : पु. ल. देशपांडे

तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. असा मी असामी मध्ये पु.ल. एका मध्यमवर्गीय माणसाचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रेखाटतात.

धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या गिरगावात रहायला असणाऱ्या एका सामान्य कारकुनाचे हे खास पु. लं. च्या शैलीतले “आत्मचरित्र” आहे. गिरगावातील चाळीतले प्रसंग, लग्नाचा प्रसंग आणि त्यातला उखाणा घ्यायचा किस्सा, पार्ल्याच्या मावशीचे घर शोधणे, ठिगळ्याचे टेलरिंग शिकवणे, एकत्र नानू सरंजाम्याच्या नाटकाला जाणे, सांताक्रूझच्या गुरुदेवांचे प्रवचन अशा अगदी साध्या प्रसंगांतून हसता हसता पुरेवाट होते. नंतर आधुनिक परिस्थिती प्रमाणे राहणीमान व एकंदर जीवनात झालेल्या बदलांचे चित्रण करण्यासाठी मुख्याध्यापिका सरोज खरे यांची भेट तर केवळ अप्रतिम.

ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात जे वाढले त्यातलाच हा एक मनुष्य! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही. लोकलगाडीसाठी धावताना, ट्राम गाठताना किंवा बसच्या रांगेत आमच्या भेटीगाठी झाल्या-आजही होतात; यापुढेही होतील. बटाट्याच्या चाळीतसुद्धा ह्याच्या नात्याची माणसे आहेतच. ह्याचेही बरेचसे आयुष्य तसल्याच खास मुंबई फ्याशनीच्या वास्तूत गेले आहे. त्याच्या ह्या आठवणी आहेत.

नव्या जगाशी जुळवून घेताना लागलेल्या धापा आहेत. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणीही तो थोडासा हसतो आणि थोडासा हसवतोही. मात्र कुणी हसल्याबद्दल त्याला मुळीच राग येणार नाही. त्वेषाने चिडून वार करायला जाणे त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कोणी डरपोकपणा म्हणेल; त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे त्याने धारिष्ट्य दाखवले हेच पुष्कळ झाले.

शेवटी पु.ल. म्हणतात, “त्यावेळचा तो धोतरवाला धोंड्या जोशी तो तसा मी होतो आजचा डी.बी. जोशी हा असा मी आहे. ह्यापुढला कसा मी होईन हे मी आजच काय सांगू? हे इतकं पुराण सांगायचा उद्देश केवळ आज आपला जसा मी आहे ते कळावे…..

अत्यंत विनोदी पण सामान्य माणसांच्या अंतर्गत भावाचे दर्शन घडवणारे पुस्तक …

पूजा आंब्रे

Leave a comment