विदर्भातील अष्टविनायक

By Bhampak Travel 4 Min Read
विदर्भातील अष्टविनायक
credit - Vidarbh Darshan

विदर्भातील अष्टविनायक –

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची मंदिरे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.

टेकडी गणपती, नागपूर –

टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते.

शमी विघ्नेश, आदासा (जिल्हा-नागपूर) –

विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर आहे. येथे टेकडीवरील गणेशमंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला ‘शमी विघ्नेश’ म्हणतात. ती महाराष्ट्रातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे ही जवळपास ६ मीटर उंच आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वाटते. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तीपैकी ही एक आहे. येथील गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. मंदिरात गणेशाची देखणी अशी भव्य स्वयंभू गणेश मुर्ती आहे.

अष्टदशभुज, रामटेक (जिल्हा-नागपूर) –

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुर्‍यात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशूळ इत्यादी आयुधे आहेत. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी.

भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा) –

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडार्‍याहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे.तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारूढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधे व मोदक आहे. नेसलेले वस्त्र, जानवे कंबरपट्टापण दिसतो.

सर्वतोभद्र, पवनी (जिल्हा-भंडारा) –

हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० सेंटीमीटर. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक समजला जातो. पवनी हे पुरातन शहर आहे. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे.

सिद्धिविनायक, केळझर (जिल्हा-वर्धा) –

विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसर्‍या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.

चिंतामणी , कळंब (जिल्हा-यवतमाळ) –

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

वरदविनायक, भद्रावती (जिल्हा-चंद्रपूर) –

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी.

Leave a comment