अस्वस्थ दशकाची डायरी –
“केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरीदेखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल”, ही कोैतुकाची थाप आहे दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या व्यासंगी विदूषीची. त्यांनी हे सारं लिहिलं आहे, ते ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ या पुस्तकाबद्दल.
‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक लिहिलं आहे अविनाश धर्माधिकारी यांनी. माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा त्यांचा प्रवास. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले. स्वेच्छानिवृत्तीनंतर चाणक्य मंडलसारख्या संस्थेतून कित्येक अधिकारी घडविले. युवकांचे प्रेरणास्थान, उत्तम वक्ता, विचारवंत, अशीही त्यांची आणखी काही रूपं.
‘अस्वस्थ दशकाची डायरीहे त्यांचं गाजलेलं पुस्तक. राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार या पुस्तकाला लाभला आहे. या पुस्तकाचं गौरी देशपांडे यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी ‘देशाचा कार्यकर्ता’ होण्याचं स्वप्न पाहिल्यावर धर्माधिकारी यांनी जाणीवपूर्वक वाणिज्य अन् कलाशाखेचा रस्ता धरला. ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता अन् मुक्त पत्रकारिता या भूमिकेतही ते कार्यरत होते. ‘माणूस’ नावाच्या साप्ताहिकात ते लेखन करायचे. पंजाब, आसाम, काश्मीर, दिल्लीतलं राजकारण, शहाबानो प्रकरण, राखीव जागांविरोधी आंदोलन, शेतकरी चळवळ, अयोध्या वाद आदींवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं. त्यातूनच त्यांचं ‘अस्वस्थ दशकाची डायरीहे पुस्तक आकाराला आलं.
1980 ते 1990 हा कालखंड या पुस्तकात अधोरेखित झाला आहे. त्यात भटकंती आहे. लोकांशी संवाद आहे. त्रयस्थपणे टिपलेली निरीक्षणं आहेत. स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे.
भारतातील कित्येक राज्यांना भेट देऊन तिथले अनुभव अविनाश धर्माधिकारी यांनी या ‘डायरी’त लिहिले आहेत. ध्येयवादाने केलेली त्यांची ही दहा वर्षांची वाटचाल देशातील परिस्थितीवर प्रकाश टाकते. त्यांनी घेतलेला भारताचा शोध मन अस्वस्थ करतो. त्यामुळं तो अगदी आवर्जून वाचावासा वाटतो.
पुस्तकाचं नाव। अस्वस्थ दशकाची डायरी
लेखक। अविनाश धर्माधिकारी
प्रकाशन। चाणक्य मंडल परिवार
पृष्ठसंख्या। 525
किंमत। 300 /- रुपये
सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा