बारा खांडी दर्शन

By Bhampak Travel 3 Min Read
बारा खांडी दर्शन

बारा खांडी दर्शन –

खांडी चा इतिहास

खांडी पडलीया  आणि आडी घातली ( उत्तरार्ध लीळा)

लीळाचरित्रात आलेल्या या खांडी शब्दाचा अर्थ वेस , वेशीचे द्वार  असा होतो . ‘  माहोर खांडी ‘ म्हणजे माहोर वेशीचे द्वार असा अर्थ  होतो . तसेच खांडी या शब्दाचा अर्थ मार्ग ,रस्ता असाही होतो . माहोर खांडी म्हणजे माहूरला जाण्याचा मार्ग ,रस्ता . माहूरला जाण्याच्या मार्गावरच खांडीची स्थापना झाल्याचे आढळते  उदा . पुसद खंडीजवळून  माहूरला जाण्याचा रस्ता आजही आहे  तसेच खांडी स्थानावरून श्रीदत्तात्रेयप्रभूंचे  क्रीडास्थान असलेल्या माहूर येथील सह्याद्री पर्वताचेही दर्शन होते . आता आपण खांडीच्या निर्मितीचा इतिहास पाहू  –

पंडित विश्वनाथव्यास हे मूळचे पैठण प्रांतातील रहिवाशी होते . मुनी कमळाकरव्यास  यांच्यापासून त्यांना बोध झाला होता .बेदर येथील लाड कामराज नावाने एक व्यापारी त्यांच्याकडे ते नोकरी करीत होते त्यांच्याकडे काही पैशाची बाकी निघाली म्हणून कामराजानी विश्वनाथ व्यासांना कैदेत टाकले हे गुर्जर शिवबासांना कळल्यानंतर ते बेदरला आले व त्यांनी विश्वनाथबासांची कैदेतुन सुटका केली . व  मग लगेच विश्वनाथबासांनी संन्यास दीक्षा घेतली व आपले उर्वरित आयुष्य परमेश्वराच्या सेवेत व्यतित केले ते आपल्या उत्तर आयुष्यात  बाळापूर येथे राहू लागले म्हणून त्यांना बाळापूरकर असे म्हणतात ‘ ज्ञानप्रबोध’ या महानुभावीय तत्वज्ञानपर ग्रथांची रचना व बारा खांडीची स्थापना हे प . विश्वनाथव्यासांच्या जीवनातील प्रमुख महत्वाचे कार्य होय .

आश्वलायन या ब्राम्हण शाखेत १४ व्या शतकात जन्मलेल्या कारंजेकर संत शाखेचे मूळ प्रवर्तक असलेल्या तपस्वी श्रीकमळाकर व्यास यांच्याकडून ज्ञानोपदेश घेणाऱ्या तसेच आचार्य श्रीगुर्जरशिवव्यासां सारख्या शास्त्रवेत्या शोधणी कारांकडून संन्यास दीक्षा प्राप्त झालेल्या व ज्ञानप्रबोध ग्रंथाचे कर्ते असलेल्या संतश्रेष्ठ पंडितविश्वनाथ व्यास बाळापूरकर यांनी श्री दत्तात्रेत प्रभूंच्या बारा खांडीची स्थापना केली . या बारा खांडींना ‘ माहोर खांडी ‘ या नावानेही संबोधले जाते. या बारा खांडी माहुरच्या परिसरात असून त्या एकांतात व निसर्ग रम्यस्थळी आहेत .

पंडित श्रीविश्वनाथव्यासांनी शके १४४० ते १४५० च्या दरम्यान बारा खांडीची स्थापना केली ते अटन- विजन करीत माहूर परिसरात आल्यानंतर जेथून श्रीक्षेत्र माहूर येथील श्रीदत्तात्रेयप्रभूंचे क्रीडास्थान असलेला सहयाद्री पर्वत सुस्पष्ट दिसतो  अश्या ठिकाणी श्रीदत्तात्रेयप्रभूंचे दर्शन व्हावे म्हणून श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या नामाचे स्मरण त्यांना दर्शन होईपर्यंत केले या तप साधनेत त्यांनी अनेक लोकांना सप्तव्यसणापासून सोडवून परमेश्वराच्या अनन्यभक्तीला लावले . त्या नवीन उपदेशी लोकांना धार्मिक संस्कार दृढ व्हावा म्हणून पंडित विश्वनाथव्यास यांना जेथे जेथे श्रीदत्तात्रेयप्रभूंचे  दर्शन झाले त्या त्या ठिकाणी माहूर येथील विंझाळे तळ्याकाठचे श्रीदत्तात्रेयप्रभूंचे  चरणांकीत विशेष आणवून त्याच्या संरक्षणासाठी ओटा बांधुन त्यात विशेषाचीं स्थापना केली .

अश्या प्रकारे ‘ जवळा ‘ गावापासून ते  ‘देहली ‘ गावापर्यंत माहुरच्या परिसरात बारा गावी तपस्चर्या करून श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या मांडलिक स्थानांची निर्मिती केली . या मांडलिक स्थानांनाच  ‘खांडी ‘ म्हणून संबोधण्यात येते आणि तेव्हापासूनच मांडलिक स्थानांच्या निर्मितीस प्रारंभ झाला .त्या बारा खांडी –

१) जवळा खांड

२)लाख( रायाची) खांड

३)दिग्रस खांड

४)पुसद खांड

५)खर्षी खांड

६)गगनमाळ खांड

७)पारडी( वानेगाव)खांड

८)मुळावा खांड

९)चुरमुरा खांड

१०)कृष्णापुर खांड

११)मन्याळी खांड

१२)देहली खांड

काही प्रमुख उपखांड :-

१) शिळोणा खांड

२)अंबाळी खांड

४)दगडधानोरा खांड

5)ढाणकी खांड

Leave a comment