आपले मस्तक अभेद्य ठेवा
ज्यावेळी एखादे अपयश आपल्या जिव्हारी लागते आणि ते आपल्याला सहन करण्यापलिकडे असते, त्यावेळी माणूस त्याचे खापर कोणाच्यातरी मस्तकी फोडत असतो. वास्तविक हे खापर फोडायला तो जे मस्तक शोधत असतो, ते शक्यतो त्याच्या जवळचेच शोधत असतो. हे खापर त्याच्या मस्तकी आपटले की याला उगीचच मोकळे झाल्यासारखे वाटते , पण ज्याच्या डोक्यावर हे फोडले जाते त्याला त्याच्या वेदना सुरू होतात आणि तो यात माझे काय चुकले ? या प्रश्नाभोवती फिरत राहतो. त्याला या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही , मग तो झक मारली आणि याच्याशी संबंध ठेवला ! या निष्कर्षाला येतो .
जी माणसे बेजबाबदार असतात ती सतत असे खापर फोडण्यासाठी डोकं शोधत असतात, त्यामुळे यांच्या स्वतःच्या डोक्याचा विकास कधीच होत नाही. जबाबदार माणसे आपल्या अपयशात स्वतःची चुक शोधतात आणि ती दुरूस्त करून नव्या उमेदीने पुन्हा लढायला सिध्द होतात. त्यांच्या जीवनात त्याच क्षेत्रात त्याच अपयशाची पुनरावृत्ती कधीच होत नाही. ही खरी जीवनाची लढाऊ वृत्ती असते आणि हीच आपल्या जीवनाच्या प्रगतीची योग्य दिशा असते. थोडक्यात आपल्या अपयशाचे खापर आपल्याच माथी मारायची सवय ज्याला असते तो सुधारल्याशिवाय रहात नाही. हे आपण आपल्या बाबतीत करू शकतो, पण दुसरा आपल्या मस्तकाच्या शोधात असतो , त्याला ते खापर आपल्या मस्तकी फोडायचे असते, त्याला टाळणे खूप गरजेचे आहे , अन्यथा आपल्या स्वतःच्या कष्टाने आपण मिळविलेलेही आपल्याला समाज सुखाने खाऊ देत नाही.
कर्तुत्ववान माणसाच्या जीवनात स्वतःमुळे तयार झालेले दुःख फार कमी असते , पण दुसऱ्याने नको असताना दान केलेले दुःख खूप असते, ते याच कारणामुळे. हे दुसऱ्याने दिलेले दुःख मनस्ताप त्रास टाळणे ही सुध्दा एक कला आहे , ती आपल्याला जमली पाहिजे कारण अपयशाचे खापर घेऊन बहुसंख्य लोक मस्तकाच्या शोधातच असतात. अशा वेळी आपण आपले मस्तक त्यासाठी कोणाच्या वापरासाठी देऊ नये, एवढाच यावर उपाय आहे. म्हणजे नेमके काय करायचे ? तर आपल्या डोक्यात त्याला स्थान देऊ नये. हे सोपे आहे, आपले डोके म्हणजे धर्मशाळा नाही की कोणीही कोणत्याहीवेळी प्रवेश करावा.
आपल्या शरीररूपी गडाचा बालेकिल्ला म्हणजे आपले मस्तक आहे ते अभेद्यच असले पाहिजे कारण बालेकिल्ला ढासळा तर गड सुरक्षित रहात नाही . आपल्याला अपयशाचे खापर घेऊन फिरणाऱ्या लोकात रहायचे असेल तर आपले मस्तक अभेद्य ठेवा आणि आपल्याच ताब्यात ठेवा, त्यासाठी त्यांच्यापासून पळून जायची गरज नाही.
– डॉ . आसबे ल.म.