भेद

bhampak post

भेद –

अंतःकरणात भेद आहे, तोपर्यंत तुलना, भीती आणि लाज निर्माण होते. जेथे तुलना आहे, तेथे मत्सर आहे, स्पर्धा आहे, दंभ आणि अहंकार आहे. आपण कोणापेक्षा तरी कमी असतो किंवा जास्त असतो, कमी असलो तर मत्सर निर्माण होतो आणि जास्त असलो तर दंभ व अहंकार निर्माण होतो.

आपल्या सुखाचा, शांतीचा आणि समाधानाचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल  तर ते भय/Fear आहे. अंतःकरणात भय असेल, तर आपण प्राप्त असलेल्या कोणत्याही गोष्टीतला आनंद मनापासून आणि संपूर्णपणे घेऊ शकत नाही, मग देवाने आपल्याला आनंद देऊन सुद्धा तो आपल्यासाठी निरुपयोगी ठरतो.

अंतःकरणातील भय अज्ञानामुळे निर्माण होत असते, त्याचबरोबर स्वतःचे स्वरूप न कळल्यामुळे होत असते. लाज निर्माण होण्यासाठी भेदच कारणीभूत असतो. स्त्री-पुरुष भेद,  उंच-नीच भेद, गरीब-श्रीमंत भेद,  सौंदर्य-कुरूप भेद, ज्ञानी आणि अज्ञानी यातील भेद, या सर्व भेदाच्या ठिकाणी आपली न्यूनता असेल, तर लाज निर्माण होते.

लाजणारा माणूस, आपल्या जवळ सर्व प्रकारची क्षमता असूनही, स्वतःला कमजोर समजतो आणि त्याच्या जीवनातील शौर्याला प्रगट होण्यापासून परावृत्त होतो. तुलना, भय आणि लाज या तिन्ही गोष्टी आपल्या प्रगतीला आणि समृद्धतेला हानिकारक आहेत. भौतिक, संसारिक आणि व्यवहारिक पातळीवरून यांना आपण कधीच संपवू शकत नाही.

जोपर्यंत आपण यांना संपवत नाहीत, तोपर्यंत विकाररहित होऊ शकत नाही आणि जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत आपण समतेत येऊ शकत नाही. जेथे समता नाही, तेथे भेद आहे. यामुळे कितीही मोठा संसार आणि प्रपंच केला तरी माणूस सुखी होऊ शकत नाही.

संसाराचे अंगी अवघीच व्यसने l
आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ll
आता हे सोहळे झाले त्रिभुवन l
विषम धोवोनि सांडियेले ll

विषमता म्हणजेच भेद गेल्याशिवाय आपल्याला शुद्ध आणि पवित्र होता येत नाही. याचा अर्थ भेद म्हणजे विषमता, हा जीवनातील खरा विटाळ आहे आणि समता हेच जीवनातील खरे सोवळे आहे अंतःकरणातून भेद म्हणजेच विषमता, ही फक्त परमार्थिक उपायाने, साधनेने संपविता येते. समतेत येण्यासाठी आत्मिक पातळीवर यावे लागते आणि आत्मिक पातळी अध्यात्मा शिवाय शक्य नाही, म्हणूनच परमार्थात सुख आहे आणि आत्मिक पातळीवर सर्व सुख आहे, असे म्हटले जाते.

ऐसा ज्याचा अनुभव l विश्वदेव सत्यत्वे ll
देव तया जवळी असे l पाप नासे दर्शने ll
कामाक्रोधा नाही चाली l भूती झाली समता ll
तुका म्हणे भेदाभेद l गेला वाद खंडोनि ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment