मालकी हक्काचे ओझे –
आपल्या जीवनातील स्वामित्व म्हणजेच मालकीहक्काचा भाव, हा आपल्या अनेक दुःखांचे कारण असतो. दास्य भावात जे सुख आहे, ते मालक होण्यात नाही, परंतु हे अनुभवाशिवाय कळत नाही.
तुका म्हणे एक l धनी विठ्ठल मी सेवक ll
आणिक काही नेणे धंदा l नित्य ध्यातसे गोविंदा ll
आपण ज्याचे अंश आहोत, तो आपला खरा मालक आहे, म्हणजेच परमात्म्याचे अंश आहोत.
ममैवंशो जीव लोके l जीव भूतस्य सनातः ll
याची जाणीव आपल्याला पदोपदी असायला हवी. आपल्या जीवनातील अनुभव आठवून पहा, ज्या ज्या गोष्टीची आपण मालकी स्वीकारलेली आहे, त्या त्या गोष्टी आपल्या जीवनात चिंता आणि काळजी निर्माण करतात. या दोन गोष्टीच आपल्या जीवनाच्या दुःखाचे कारण असतात. चिंता आणि काळजी या दोन्ही वरील रामबाण उपाय म्हणजे मनाने आणि स्वभावने स्वीकारलेले दास्यत्व आहे.
विश्व माऊली ज्ञानदेव म्हणतात,
तू माझा स्वामी मी तुझा रंक l
पाहता न दिसे वेगळीक ll
दास्य भाव, आपल्या देहाच्या मर्यादा समजल्याशिवाय स्वीकारला जात नाही. आज व्यहारी जीवनातही कोणालाही दास किंवा गडी म्हणलेले आणि झालेले आवडत नाही, प्रत्येकाला मालकच असावे वाटते.
विचार करून पहा दासाच्या किंवा गड्याच्या शरीराला कष्ट पडत असते, परंतु _मनाने तो खूप सुखी आणि निष्चिंत असतो_. मालकाच्या शरीराला कष्ट पडत नाही, परंतु _मनातून तो काळजी आणि चिंता यांनी पोखरलेला असतो_. तरीही आपल्याला मालकीहक्क सोडावा वाटत नाही.
आपण आयुष्यभर हे मालकी हक्काची ओझे डोक्यावर घेऊन फिरत असतो. ते ओझे आहे, हे कळेपर्यंत आपले आयुष्य संपून जाते. वास्तविक या जगात आपले काय आहे ⁉️ याचा विचार वेळेत केला, तरच हे ओझे आपल्याला फेकून देता येते.
देह हे काळाचे धन कुबेराचे l
तेथे मनुष्याचे काय आहे ll
देता देवविता नेतानेवविता l
येथे याची सत्ता काय आहे ll
निमित्तचा धनी केला असे प्राणी l
तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ll
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.