हिशोब –
आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे हिशोब असतात. या हिशोबाच्या बेरीज वजाबाक्या करत संपूर्ण आयुष्य खर्च होते. यात स्वतःसाठी जगणे विसरून जाते कारण जागेपणीचा सगळा वेळ आपला आयुष्याचा हिशोब करण्यात जातो. झोपलेल्या अवस्थेत गेलेला वेळ, हा खरे तर वाया गेलेला असतो. जगणे जागेपणीचे मोजले जाते, त्यामुळे झोपेचा वेळ जगण्यात मोजला जात नाही. आपल्या डोक्यात सर्वात मोठा हिशोब हा भावनिक/emotional असतो.
माझे कोण कोण आहे⁉️ मी कोणाचा आहे⁉️ हा भावनिक हिशोब असतो. त्यानंतर आर्थिक हिशोब असतो, आज सगळ्यांची झोप या हिशोबाने उडविलेली आहे. गरजेइतके पैसे नसले तरी झोप उडते आणि गरजेपेक्षा जास्त असले तर ते सांभाळण्याच्या चिंतेने झोप उडते.
झोपेचा सर्वात मोठा शत्रू हा आर्थिक हिशोब आहे. त्यानंतर मानपानाचा हिशोब असतो, इर्षा, मत्सर, द्वेष याचा हिशोब असतो. कपट, खुन्नस, बदला याचा वेगळा हिशोब असतो. व्यसन , वासना याचा हिशोब असतो, धर्म, परोपकार, पुण्य ,परमार्थ याचा हिशोब असतो. राजकारण, समाजकारण याचा हिशोब असतो. भविष्याची तरतूद आणि त्याची काळजी हाही एक हिशोब असतो. समाजातील आपले स्थान आणि प्रतिष्ठा याचा हिशोब असतो. स्थावर आणि जंगम मालमत्ता याचा हिशोब मरेपर्यंत सुटत नाही. अशा अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या हिशोबांनी आपले डोके गच्च भरलेले असते. त्यामुळे मन कायम अस्वस्थ असते.
ज्याचे मन अस्वस्थ आहे, त्याला शांती मिळत नाही. हा सर्व हिशोब एकदा डोक्यातुन काढून टाकला, की मग जे उरते ते सुखी-समाधानी आयुष्य असते. हा हिशोब संपवणे व्यावहारिक पातळीवर केवळ अशक्य आहे. हा सर्व हिशोब संपवायचा असेल तर आपल्याला स्थितप्रज्ञ बनावे लागते. ही स्थितप्रज्ञता साधनेने प्राप्त होते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली की आपले आयुष्य खऱ्या अर्थाने स्थिर होते.
जोपर्यंत या अवस्थेत आपण येत नाही, तोपर्यंत आपण अस्थिर, अशांत आणि अस्वस्थच असतो. स्थितप्रज्ञतेत देहाशी संबंधित सर्वच विषयांचा त्याग होतो. वरील सर्व हिशोब हे देहाशी संबंधित आहेत.
विदेही अवस्था प्राप्त झाली की खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगणे सुरू होते. आजच विचार करून पहा मी स्वतःसाठी किती जगलो⁉️ किमान उरलेले आयुष्य तरी मला स्वतःसाठी जगता आले पाहिजे.
असो ऐसा कोठे आठवचि नाही l देहीच विदेही बघू दशा ll
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार l आनंदे निर्भर डुल्लतसे ll
हे खरे जगणे आहे, मृत्यूपूर्वी काही क्षण तरी आपल्याला असे जगता आले पाहिजे.
डॉ. आसबे ल.म.