बिघडण्याची संधी

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

बिघडण्याची संधी –

आपल्या जीवनात सुधारण्याच्या अनेक संधी येतात, तशाच बिघडण्याच्याही अनेक संधी येतात. कधी सुधारण्याच्या संधीचे सोने होते, तर कधी बिघडण्याच्या संधीमुळे आजपर्यंत मिळवलेले मातीमोल होते. या दोन्ही प्रकारच्या संधी जीवनात समसमान येतात. आपल्या अंतःकरणाची शुद्धता, ध्येय, संस्कार आणि संगत यावर आपले सुधारणे आणि बिघडणे अवलंबून असते.बिघडण्याची संधी.

भगवंतांनी आपल्या प्रत्येकाला काही विशिष्ट हेतूने आणि काही विशिष्ट कामासाठी जन्माला घातले आहे. भगवंताने आपल्यासाठी नियोजित केलेले काम, आपल्याला वेळेत कळाले तर आपले जीवन सफल होते, नाही कळाले तर निष्फळ होते. ज्या व्यक्तीला भगवंताने आपल्यासाठी नियोजित केलेले काम वेळेत समजते आणि ती व्यक्ती कर्मयोग्याप्रमाणे ते काम करत असेल, तर त्याच्या जीवनात येणाऱ्या बिघडण्याच्या संधी त्यालाही टाळता येत नाहीत, परंतु अशा निर्णायक क्षणी भगवंताची अलौकिक शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्या व्यक्तीला बिघडण्यापासून वाचविते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनात एक प्रसंग विकृतीच्या वळणावर जाणारा आला होता. त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना ऐनवेळी आवरले आणि गटाराकडे जाणारी त्यांची पाउले पवित्र गंगेकडे आपोआप वळाली. महात्मा गांधी म्हणतात कदाचित माझे आराध्य दैवत, ईश्वर त्या व्यक्तीच्या अंगात अवतरले असावे आणि माझ्या जीवनातील अधोगतीला जाणारी पाउले प्रगतीपथाच्या दिशेने वळविली गेली.

मागे पुढे उभा राहे सांभाळीत l आलिया आघात निवाराया ll याचा अर्थ याच्यापेक्षा वेगळा काय असू शकेल ?

आपले संस्कार जसे असतील, तसे विचार डोक्यात येतात आणि या विचारानुसार आपला आचार ठरत असतो. आपले संस्कार, हे आपल्या संगतीवर अवलंबून असतात. आपली संगती पवित्र सत्यमूर्ति, आचारशील अशा चांगल्या व्यक्तीशी असेल, तर आपल्यावर त्या संगतीचे संस्कार होतात. कितीही बिघडण्याची संधी आली तरी हे संस्कार आपल्याला शुद्ध आणि पवित्र ठेवण्यास सक्षम असतात.

जन्मा आलो त्याचे l आजी फळ झाले साचे ll
तुम्ही सांभाळीले संती l भय निरसली खंती ll
कृतकृत्य झालो l इच्छा केली ते पावलो ll

तुकोबारायांच्या जीवनातील हा संतसंगतीचा अनुभव आहे. त्यांच्याही जीवनात एक परस्त्री डोकावून गेली होती, ही बिघडण्याची संधी होती. त्यावेळी तुकोबाराय बोलले

जाई ओ माय l ही सत्संगतीची आणि संस्काराची ताकद आहे.

वासनेच्या अपेक्षेने आलेल्या स्त्रीला टाळणे सोपे आहे, परंतु तिला माय किंवा आई म्हणणे आणि त्याप्रमाणे आपला आचार शुद्ध ठेवणे खूप अवघड आहे. त्यासाठी संतच व्हावे लागते,

तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण l तरीच महिमान येईल कळो ll

व्यवहारिक जीवनात अशा बिघडण्याच्या संधी खूप येतात, जसे एखाद्याचे पैसे बुडविणे, एखाद्याला लुटणे, एखाद्यावर अन्याय करणे, बांध पोखरणे, दादागीरी करणे, अशा प्रकारच्या आपल्या जीवनात येणाऱ्या अनैतिक आक्रमणावेळी आपले संस्कार आणि संगत या दोन गोष्टीच आपल्या नैतिकतेचे खरे सुरक्षा कवच असतात. असे कवच नसलेली माणसे कितीही मोठी असू द्यात, कितीही ताकदवान असू द्यात, या आक्रमणाला निश्चित बळी पडतात.

ब्रम्हरस गोडी तयासी फावली l वासना निमाली समूळ ज्याची ll
नाही त्या विटाळ अखंड सोवळी l उपाधी वेगळा जाणिवेच्या ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार

Leave a comment