दान | Charity –
आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्याशिवाय आपल्या हातून दान घडत नाही. दयेविना झालेले दान मोबदल्याची अपेक्षा करते, अशा अवस्थेत केलेले दान शुद्ध रहात नाही. आपले मूळ स्वरूप हे परिपूर्ण आहे, त्यामुळे आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न होत असते, परंतु ती कृतीत उतरण्यापूर्वी आपला स्वार्थ जागा होतो आणि तो एवढा मोठा असतो की त्यामुळे उत्पन्न झालेली दया धुळीस मिळते.
स्वार्थ निर्माण झाला की आपल्या स्वरूपावर त्याचे आवरण चढते, त्यामुळे मूळ स्वरूप झाकले जाते आणि आपण स्वतःला अपूर्ण समजू लागतो. हे अपूर्णत्व जोपर्यंत शिल्लक आहे, म्हणजेच अज्ञान शिल्लक आहे, तोपर्यंत आपण दान करण्याचा विचारही करू शकत नाही.
आज जागतिक महामारीच्या काळात अनेक लोक दान करत आहेत.
श्रीमद्भगवद्गीता सांगते, देश, काळ आणि पात्र पाहून दान करावे. आज या तिन्ही गोष्टी आपल्या देशात अनुकूल आहेत, त्यामुळे दान करण्याची ही आपल्या जीवनातील अतिशय योग्य वेळ आणि काळ आहे. धर्मशास्त्रात दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत, तामस दान, राजस दान आणि सात्विक दान.
तामस दान – आपल्याकडे जी वस्तू, आपल्या उपयोगाची नाही किंवा आपल्या दृष्टीने निरुपयोगी आहे, तिचे दान करणे, हे तामस दान आहे. आज गरजूंना मदत करत असताना आपण असे तरी करत नाही का⁉️ याचा तपास स्वतः करावा.
राजस दान – या दानाच्या प्रकारांमध्ये माणूस दान करत असतो, परंतु त्याला त्याच्या प्रसिद्धीची अपेक्षा असते. आज कोरोनाच्या काळात, हेच दान बहुतेक ठिकाणी केल्याचे दिसून येत आहे. आजच्या काळात या दानालाही हरकत घेण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला दानशूर म्हणून गरजूंना मदत होत असेल, तर अशा दानशूर उपाधीची अपेक्षा करणाऱ्या माणसाला प्रसिद्धी द्यायला काही हरकत नाही.
धर्मशास्त्रात या दानाला कवडीमोल किंमत आहे, परंतु आजच्या व्यवहार शास्त्रात यालाही किंमत आहे.
सात्विक दान – हे दान अतिशय कठीण आहे, आपण दान करतोय , याचे भानही अशा व्यक्तीला नसते. आपण काय देतोय हेही अशा दात्यांना समजत नाही आणि आपण कधी दान केलेले आहे, हेही ज्यांच्या लक्षात रहात नाही, ते खरे |सा|त्वि|क| दान आहे.
आयुष्यात एक क्षणतरी अशा सात्विक दानाचा आपल्याला अनुभवता आला, तर जीवन कृतार्थ झाले, असे समजावे. धर्मशास्त्रात या दानाला, सर्वोच्च दान समजले आहे, परंतु हे करताना सुद्धा देश काळ आणि पात्र यांची अट धर्मशास्त्राने घालून दिलेली आहे.
माझ्याकडे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत _काहीच नाही ! असे येत आहे, तोपर्यंत दानाचा विषय आपल्या मनातही येत नाही. माझ्याकडे जगाला अर्पण करण्यासाठी माझी कला आहे, ज्ञान आहे, शारीरिक शक्ती आहे, विचार आहे, वेळ आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याचे कधीच कोणीही मूल्य करू शकत नाही, असे अमूल्य प्रेम माझ्याकडे आहे, याचे दान मी भरभरून करू शकतो, फक्त भगवंता !
हे दान करत असताना मला सात्विक वृत्तीने करण्याची बुद्धी आणि बळ दे ! कारण ही गोष्ट माझ्या आवाक्यातील नाही.
दया तिचे नाव l
भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे ll
धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार l
निवडीले सार असार ते ll
डॉ. आसबे ल.म.