चवदार तळं, महाड

By Bhampak Travel Sunil Shedage 2 Min Read
चवदार तळं, महाड

चवदार तळं, महाड –

20 मार्च 1927 मध्ये महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकणातल्या महाड (जि. रायगड) इथं चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यातून महाड अन् चवदार तळं हे नात अभेद्य बनलं. चवदार तळं अन् डाॅ. बाबासाहेब हे समीकरणही अतूट ठरलं.

साताऱ्यातून महाबळेश्वर. मग पोलादपूर. पुढं मुंबई- गोवा महामार्ग. पोलादपुरातून काही अंतरावरच महाड असा हा प्रवास. बहुतेक रस्ता वळणावळणाचा. अंबेनळीच्या घाटमार्गाचा. उंचच उंच कडे अन् काळीज धस्स करणाऱ्या दऱ्या. वाटेत सावित्री नदीवरचा पूल लागतो. 2016 मध्ये पावसाळ्यातल्या दुर्घटनेमुळं साऱ्या देशभर त्याचं नाव पोहचलं होतं. अाता तिथं नवा पूल उभा राहिला आहे. तोही विक्रमी 165 दिवसांत. पूल ओलांडून पुढं गेलं, हायवे सोडून डाव्या हाताला वळलं, की मग महाड येतं.

महाड ही हुतात्म्यांची भूमी. इथली पालिकाही खूपच जुनी. सावित्री- गांधारी नद्यांचा संगम इथंच आहे. इथलं वीरेश्वराचं मंदिरही प्रसिद्ध आहे. हे इथलं प्राचीन देवस्थान. त्यासमोर तलाव. त्यात शंकराची मूर्ती.

तिथून नजीक चवदार तळं दिसतं. ते चांगलंच मोठं. लांब- रूंद. त्याचं स्थापत्यकाम प्रेक्षणीय ठरणारं आहे. भोवताली उंच सावलीदार झाडं आहेत. हे तळं म्हणजे इतिहासाचं साक्षीदार. समतेचं प्रतीक. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळा इथं आहे. समोर छानसं उद्यान आहे. बाजूला भव्य सभागृह. तिथून काही अंतरावरच क्रांतिस्तंभ आहे.

साताऱ्यातून महाडची भटकंती एका मुक्कामाची. त्यात महाबळेश्वर सोडलं, की पारमधल्या वरदायिनी देवीचं मंदिर पाहता येतं. तिथं नजीकच जुना शिवकालीन भक्कम पूल आहे. पोलादपुरात जाण्यापूर्वी नरवीर तानाजीच्या उमरठ गावी जाता येतं. महाडनजीकच बोैद्धकालीन लेणी आहेत. महाडची सफर करुन वरंधा घाटातून भोरला येणं हा अनुभवही तितकाच थरारक अन् अविस्मरणीय ठरतो.

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment