स्वतःशी स्पर्धा-
आपण इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी, याचा निश्चित आपल्याला फायदा झाल्याशिवाय रहात नाही. दुसऱ्याबरोबर स्पर्धा करण्याला मर्यादा आहेत, समोरचा जसा आहे, त्याच्यापेक्षा आपण चांगले झालो, की त्याच्याबरोबरची स्पर्धा संपते, परंतु स्वतःबरोबरची स्पर्धा शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवता येते.
आज आपण जसे आहोत किंवा या क्षणाला जसे आहोत, त्याच्यापेक्षा जास्त चांगले, पुढच्या क्षणाला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः स्वतःशी स्पर्धा करणे आहे.
माणसाचा भूतकाळ आणि इतिहास हा नेहमी अशा स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या माणसाला मार्गदर्शक ठरतो, गुरु ठरतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांविषयी पश्चाताप करून घेण्याऐवजी त्यांना आपला अनुभव म्हणून स्वीकारला, तर घडून गेलेल्या प्रत्येक घटनेतून आपल्याला शहाणपण येत गेलेले असते.
अनुभवातून येते ते खरे शहाणपण असते आणि या शहाणपणातूनच आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो. व्यक्तिमत्व विकास, ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, परंतु ती क्रियाशील व्यक्तीच्या जीवनातच चालू असते, निष्क्रिय माणसांना विकासाची किंमतच नसते.
आपली स्पर्धा आपल्याशीच सुरू करायची असेल किंवा सुरू ठेवायची असेल, तर दररोज स्वतःला तपासले पाहिजे, म्हणजे आत्मनिरीक्षण आणि परीक्षण केले पाहिजे. आपली या क्षणाची अवस्था, त्याशिवाय आपल्याला समजत नाही. या क्षणाला आपल्यात जी कमजोरी आहे, जे दोष आहेत, ते दिसले तरच दूर करता येतील आणि हे स्वतःला तपासल्याशिवाय समजत नाहीत. पुढच्या क्षणाला मी सक्षम आणि निर्दोष असेल याच्यासाठी अखंड प्रयत्नशील राहण्याची वृत्तीच माणसाला स्वतःशी स्पर्धा करायला भाग पाडते.
आपल्या जीवनातील व्यक्तिमत्व विकास दुसऱ्याकडे पाहून आपण करत असू, ठरवत असू, याचा अर्थ बहिर्मुख होऊन ठरवत असू, तर तो कधीही तपासून पहा, अपूर्णच असणार. आपला व्यक्तिमत्वविकास हा आपल्या स्वतःकडे पाहून, तपासून, अंतर्मुख होऊन, आपण करत आणि ठरवत असू, तर तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास असतो कारण आपल्यातील कमजोरी आणि दोष आपल्याइतके कोणालाच माहीत नसतात.
दुसऱ्याचा आदर्श घ्यायला हरकत नाही, परंतु स्पर्धा मात्र स्वतःशीच असावी. दुसऱ्याशी स्पर्धा केली तर मत्सर, ईर्षा, द्वेष हे दोष निर्माण होतात, खरे तर हा व्यक्तिमत्वाचा विकास नसतो, तर ती अधोगतीच असते. आपण स्वतःशी स्पर्धा सुरू ठेवली, तर आपल्या अंतःकरणातील षड्विकारांचा आणि दोषांचा नाश होतो, आपले चित्त शुद्ध होते आणि ही खरी जीवनातील प्रगती असते.
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती l व्याघ्रही न खाती सर्प तया ll
विष ते अमृत आघात ते हीत l अकर्तव्य नीत होय त्यासी ll
हा खरा व्यक्तिमत्व विकास आहे आणि तो स्वतःशी स्पर्धा करूनच प्राप्य आहे.
डॉ. आसबे ल.म.