अज्ञानाची कबुली

bhampak post

अज्ञानाची कबुली –

आपल्याला काही कळत नाही, हे ज्याला मनापासून मान्य असते, त्यालाच जीवनात अपेक्षित असलेले ज्ञान सहज प्राप्त होते. ज्ञान मिळवण्यासाठी हाच खरा मूलभूत अधिकार आहे. माणूस स्वतःच्या अज्ञानाला जेवढा घाबरत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आपले अज्ञान लोकांना कळेल यासाठी घाबरत असतो. जीवनातील कोणतेही अज्ञान हानीकारकच असते, म्हणून माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानी होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.

समाजामध्ये सर्वज्ञ असणारी माणसे अतिशय विरळ असतात, अल्पज्ञानी_ काही प्रमाणात असतात आणि अज्ञानी_ सर्वात जास्त असतात. हे _एकदा आपल्या मनाने समजून घेतले, तर आपल्याला आपल्या अज्ञानाची लाज वाटत नाही ज्याला समजत नाही, त्यालाच समजावून सांगितले जाते, ज्याला कळत नाही, त्यालाच जाणते केले जाते. त्यामुळे ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे, अशा गुरुसमोर आपण नेहमी आपले अज्ञान कबूल करावे.

माणसे आपला स्वतःचा प्रभाव (इम्प्रेशन) पाडण्यासाठी, आपले अज्ञान लपवून आपण ज्ञानी असल्याचा आव आणत असतात. आपल्याला शिकवणारा गुरु त्या क्षेत्रातला बाप असतो. त्याला आपल्यातील कमीपणा, न्यूनत्व,अज्ञान स्पष्ट दिसत आणि समजत असते. आपले ढोंगही त्याला समजत असते. अशा वेळी गुरु मौन धारण करतात आणि आपल्यालाच बोलू देतात.

समोरचा मौन धारण करून आपल्याला ऐकतोय, याचा अर्थ आपण त्यांना जिंकले असे होत नाही, तर ते त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला समजून घेत असतात आणि आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारत असतात. याला सुधारण्याची आणि ज्ञानी होण्याची वेळ अजून आलेली नाही, असे समजून ते शांत राहतात. आपल्या जीवनातील हा सर्वात तोट्याचा काळ असतो.

अज्ञानी असुनही आपण खूप शहाणे आहोत, हे पटविण्यासाठी असा तोटा आपण जीवनामध्ये खूपवेळा केलेला असतो आणि करत असतो, म्हणूनच आपण ज्ञानी होण्यासाठीचा राजमार्ग आपल्यासाठी बिकट करून ठेवलेला असतो किंवा बंद केलेला असतो. जगात ज्ञान क्षणोक्षणी, पदोपदी देणारे गुरु आपल्याला भेटत असतात. त्यात काही जड असतात, तर काही चेतन असतात.

ब्रम्हमुर्ती असलेल्या श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले. त्यात जड आणि चेतन असे सर्वच प्रकार आहेत. भगवंताचा अवतार असून, प्रत्यक्ष परब्रम्ह असूनही श्री दत्तात्रयांना चोवीस गुरुंची गरज का भासली_⁉️ या प्रश्नाचे चिंतन केले, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला ज्ञानाची गरज शेवटपर्यंत आहे.

प्रत्यक्ष परब्रम्हाला चोवीस गुरूंची गरज लागली,⁉️ आपल्याला किती गुरूंची गरज लागेल⁉️ याचा विचार करा आणि मनापासून आपण अज्ञानी आहोत, हे  कबूल करा.

ॐ नमो ज्ञानेश्वरा l करूणा करा दयाळा ll
तुमचा अनुग्रह लाधलो l पावन झालो चराचरी ll
मी कळाकुसरी काहीच नसे l
बोलतो वचने अतिभावीके ll
एका जनार्दनी तुमचा दास l
त्याची आस पुरवावी ll

शांतीब्रम्ह असलेले नाथमहाराज, विश्व माऊली ज्ञानदेवांसमोर आपले अज्ञान कबूल करतात, मग आपल्याला ज्ञानी होण्यासाठी प्रवासाचा किती पल्ला गाठायचा आहे⁉️ याची कल्पना येते.

वाचावी ज्ञानेश्वरी l डोळा पहावी पंढरी ll
ज्ञान होय अज्ञानासी l ऐसा वर या टीकेसी ll
ज्ञानू होय मूढा l अतिमूर्ख त्या दगडा ll
वाचेल जो कोणी l जनी त्यासी लोटांगणी ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment