धोकादायक मन | Dangerous mind

bhampak-banner

धोकादायक मन –

गुंतलेले मन बाहेर काढणे खूप अवघड असते, आपण यातून बाहेर पडावे असे किती जरी वाटत असले, तरी शरीर त्यातून बाहेर निघते पण मन निघता निघत नाही. असे गुंतलेले मन शरीराचे काही चालू देत नाही त्यापेक्षाही शरीराचे ते काहीच ऐकत नाही, म्हणून मनाला मोकळे सोडणे धोक्याचे असते.

मनो मार्गे गेला l तो येथे मुकला ll
हरिपाठी स्थिरावला  l तोचि धन्य ll

विश्व माऊली ज्ञानदेवांनी मनाच्या मार्गाने जाणार्‍या माणसाला अशा पद्धतीने त्याच्या जीवनाच्या लाभाच्या ठिकाणी, तो मुकला, असे संबोधले आहे. आज आपल्या सगळ्यांचे मन मोकळे आणि स्वैर आहे. लॉकडाउनच्या  काळामध्ये बसून बसून शरीर कंटाळले आहे, त्यापेक्षा मन अतिशय चंचल झालेले आहे. त्याला किती आवरायचा प्रयत्न केला, तरी ते आवरेनासे झाले आहे. हे कमालीचे अस्वस्थ झालेले मन काय करून ठेवेल ? याचा भरवसा नाही, म्हणून *शरीराला काम नसले तरी*

मनाला काम लावले पाहिजे. मनाला काम लावायचे असेल, तर चिंतन, लिखाण, वाचन, खेळ, छंद अशा ठिकाणी त्याला गुंतवले पाहिजे, अन्यथा बाहेर रोगाचा धोका आहे आणि घरात चंचल मनाचा धोका निश्चित आहे.

ध्यानाने मन स्थिर होते, शुद्ध होते. असे शुद्ध झालेले स्थिर मन, आपल्या जीवनात अनोखी क्रांती करून जाते, परंतु साधनेनंतर शुद्ध झालेले मन मोकळे असले की ते विषयाकडे ओढ घेते. मनाला कोणता विषय कधी आवडेल⁉️ याचा अंदाज सुद्धा आपण करू शकत नाही. मनाला देहबुद्धी सोडण्याची सवय लावली, तर हा धोका टाळता येतो. दुर्दैवाने देह मनाचे ऐकतो, परंतु मन देहाचे कधीच ऐकत नाही.

दारुड्याची पावले दारूच्या दुकानाकडे मनच घेऊन जाते, शरीरिने कितीही आवर घातला तरी मन ताब्यात रहात नाही. सत्पुरुष म्हणून ख्याती पावलेले अनेक महात्मे, वाममार्गाला जाऊन आपला सर्वनाश करून घेतात, ते केवळ या ताब्यात नसलेल्या मनामुळेच.

मन वढाय वढाय l उभ्या पिकातलं ढोरं ll
किती हाकला हाकला l फिरी येतं पिकावरं ll

संत वृत्ती असलेल्या कवयत्री बहिणाबाई चौधरी, यांनी आपल्या मनाची अवस्था या प्रकारे व्यक्त केलेली आहे. यावरून निश्चित लक्षात येते की मन आवरणे किती अवघड आहे⁉️ संसारात आणि नात्यात गुंतलेले मन शरीराला ढोरासारखे राबवून घेते. आपले कुटुंब, सगेसोयरे, नातलग यांच्यासाठी जिवाचे रान करूनही शेवटी हाती काहीच लागत नाही, अशावेळी पश्चातापाशिवाय काहीच उरलेले नसते.

पश्चात्ताप होऊन वैराग्य आले, तर कदाचित फायदा होऊ शकतो, परंतु जर पश्चाताप होऊन वैताग आला, तर मात्र प्रचंड नुकसान होते.

धोबी का कुत्ता l न घर का ना घाटका l अशी अवस्था होऊन बसते. एखाद्या व्यक्तीत अडकलेले मन त्या माणसाला, माणूस राहू देत नाही. ती व्यक्ती सोडून त्याला दुसरे काहीही सुचत, दिसत आणि आठवत नाही. तुळसिदासासारखा महात्मा, महापूर आलेली नदी ओलांडून कसा गेला, हे त्याला कळलेच नव्हते, कारण व्यक्तीत अडकलेले मन, त्या व्यक्तीला बेभान करत असते. अशी अडकलेली माणसे आपले वैभव, प्रतिष्ठा, कला, ज्ञान या सगळ्यावर पाणी सोडून⁉️ भिकारी का होतात ⁉️

याचे उत्तर व्यक्तीत अडकलेले मन, बाहेर काढणे निव्वळ अशक्य आहे ! असंच आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दृष्ट्या आपण भिकारी होत चाललो आहोत, हे दारिद्रय तात्पुरते आहे, परंतु चुकून जर आपण मन एखाद्या ठिकाणी गुंतवून, घाण ठेवून मानसिकदृष्ट्या दरिद्री झालो, तर हे दारिद्र्य कायमचे असते आणि ते शरीराला भिकारी केल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment