प्रिय मृत्यु

प्रिय मृत्यु

प्रिय मृत्यु –

प्रिय मृत्यु,

तूला थोडं आश्चर्य वाटलं असेल की, सगळ्यांना अप्रिय असणारा मी याला प्रिय कसा काय वाटू शकतो? असं तुला नक्कीच वाटू शकतं. पण खरं सांगायचं तर आता ज्या पद्धतीने तू काम करत आहेस न थकता आणि न कंटाळा तुझं कौतुक करावं वाटतं. म्हणून तुला प्रिय म्हणतोय. जरा विश्रांती घे बाबा किती ते काम! जीवाला जरा आराम वैगेरे आहे की नाही.

तुझ्या बद्दल लहान असल्यापासून खरं तर ऐकत आलोय. पण लहान होतो तेंव्हा तुझ्या बद्दल कसलीच भावना नव्हती. जसं जसं मोठं होत गेलो तुझ्या बद्दल ची उत्सुकता वाढत गेली. उत्सुकता वाढली खरी पण ती तुझ्या पासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहायची. पण हे लांब राहणं किंवा तुझ्या बद्दल च्या गप्पा टाळणं खरं तर पळवाट आहे. कारण, कधी ना कधी तुझी भेट होणारचं आहे. मग ती भेट कधी होणार ते माहीत नाही कारण ही भेट अनिश्चित आहे. म्हणून तुझ्या बद्दलच कुतूहल आता हळू हळू कमी होत जात आहे.

तुला सगळ्यांची खूप आपुलकी आहे ज्याला ज्याला तू भेटतोस त्याला परत सोडतच नाहीस. म्हणून तुला लोक घाबरतात कारण तुझी सोबत ज्याने केली त्याला माघारी फिरता येतच नाही. खरंतर तुला कोणी पहिलंच नाहीये. तू कसा दिसतो, तुझं रूप कसं आहे, तू प्रत्यक्ष कोणाला दिसला नाहीस. तरी देखील तुझं अस्तित्व मात्र आहे. तू जर एखाद्याला भेटायचं ठरवलं तर तुझ्या पासून कितीही लपण्याचा प्रयत्न केला तुझ्या पासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तरी येतोच. मग मात्र तुला वेळेचं जागेचं भान नसतं. तुझं कर्तव्य तू पार पडतोच. तुझ्या एवढा निष्ठावंत जगात कोणीही नसेल कारण एख्याद्याला तू जर कवेत घेतलंस तर त्यातून त्याची सुटका नाही होत.

पण, तू जेवढा निष्ठावंत आहेस तितकाच तू क्रूर आहेस. दयेला विनंतीला तू झिडकारून लावतोस. जे अगदी मनापासून तुझी वाट पाहतात त्यांना तू भाव देखील देत नाही. पण स्वप्नात ही तुझा विचार नसतो अशा लोकांना तू घेऊन जातोस ना तेंव्हा खूप राग येतो तुझा. तू निष्ठावान आहेस पण निष्ठूर ही तितकाच आहेस. तुझ्या येण्याची चाहूल कोणालाच येऊ देत नाहीस. वेळ, काळ, वय, परिस्थिती कशाचीच पर्वा करत नाहीस. इतका निर्दयपणे कसा वागतोस कधी कधी कळत नाही.

पण तू तुझं कर्तव्य पार पाडत आहेस. तेच कर्तव्य जरा कमी कर जगभरात आता कोरोना चा मुखवटा घालून जी तुझ्या कामांवर निष्ठा दाखवत आहेस त्याला जरा आवर घाल. खूप लोकांना तू भेटलास त्यांना कायमस्वरूपी दूर घेऊन गेलास. आता जरा विश्रांती घे जमलं तर…

Vijayash Bhosale 

Leave a comment