नैराश्य | Depression

bhampak-banner

नैराश्य | Depression –

आपल्या जीवनात नैराश्य आलेला काळ हा सर्वात वाईट आणि धोकादायक  काळ असतो. एकवेळ माणसाला भरलेल्या नदीच्या महापूरातून बाहेर पडणे सोपे आहे पण नैराश्यातून बाहेर पडणे अवघड आहे. हे अवघड जरूर आहे पण अशक्य मात्र निश्चित नाही .

अपेक्षाभंग होताच माणसाला नैराश्य चिकटते , आपल्या कमजोरीचे स्थान विरोधकाला सापडताच नैराश्य चिकटते , सततच्या अपयशानेही माणूस नैराश्यग्रस्त होतो , इतरांशी तुलना करण्याच्या सवयीनेही माणसाला नैराश्य येते . अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. खंबीर मनाची माणसे यातून तरून जातात, कमजोर मनाची माणसे एकदा कोलमडली की पुन्हा उभी राहणे खूप दूर्मिळ असते . नैराश्यग्रस्त माणूस घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करत बसतो, त्यामुळे त्यातून बाहेर निघण्या ऐवजी त्यात अधिक अधिक गुंततच जातो .

भूतकाळ हा फक्त अनुभव म्हणून स्वीकारला पाहिजे , त्याला ढवळून काहीच प्राप्त होत नाही . भूतकाळातील घटना घोकत बसणे. हे भूतकाळाला ढवळणेच असते , त्याने आपला वर्तमानकाळ निश्चित खराब होतो आणि भविष्यकाळ अंधकारमय होऊन जातो.

मन उत्साही असेल तर चैतन्याचा झरा अंतःकरणात अखंड प्रवाहीत होत असतो . अशा सळसळत्या चैतन्यमय व्यक्तीच्या जीवनात कधीच नैराश्य येत नाही . अशा व्यक्तीच्या जीवनात अपयश, अपमान , अपेक्षाभंग, दुःख हे येत असते , पण त्याचे उत्साही मन त्यांना स्थान देत नाही, मग जे थांबतच नाही त्यात मन अडकत नाही . ज्याचे मन अशा गोष्टींना स्थान देते ते गुंतत जाते आणि फसते .

विचारपूर्वक निर्णय घ्यावेत , प्रयत्न चांगल्यासाठी करावेत पण तयारी वाईटाची करावी , झालेल्या घटना साक्षीभावाने पहाव्यात आणि आपण कचरा फेकून देतो त्याप्रमाणे त्या फेकून द्याव्यात , जीवन कृतीशील असावे पण ते निरपेक्ष असावे . आपल्या कमजोरीची स्थाने जगाने शोधून काढण्यापूर्वी आपणच ती शोधून काढावीत आणि भक्कम करावीत . आपली तुलना जगात कोणाशीही करू नका कारण जगात तंतोतंत आपल्यासारखा कोणीही नाही, आपण अद्वितीय आहोत, हे स्वतः अनुभवून जाणून घ्या. ही शिदोरी आपल्यजवळ असेल तर या विश्वात आपल्याला नैराश्यग्रस्त बनविण्याची ताकद कशातही नाही .

डॉ . आसबे ल. म.

Leave a comment