चर्चा | Discussion | Debate

bhampak-banner

चर्चा | Discussion | Debate –

कोणत्याही माणसाला आपल्या जीवनात येणाऱ्या यशाची चर्चा ऐकायला आवडत असते आणि अपयशाची चर्चा अजिबात होऊ नये असे वाटत असते. दुर्दैवाने समाजात यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त होते, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी माणसाचा नेहमी अपेक्षाभंग होतो, म्हणून यश मिळूनही माणूस समाधानी होत नाही आणि अपयशात त्याला धीर धरवत नाही. माणसात होणारी चर्चा त्याला नेहमी अस्वस्थ करत असते. समाजाची ही रीतच आहे, यात कधीच बदल होत नाही आणि होणारही नाही.

छत्रपती शिवरायांच्या अफजलखान वधाच्या महापराक्रमातही अफजल खान शरीराने किती मोठा होता⁉️ तो किती क्रूर होता⁉️ याची चर्चा नेहमी जास्तच होते. आपल्या जीवनात येणाऱ्या छोट्या-मोठ्या यशाचे कौतुक व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आपले यश, यावरची चर्चा ऐकायला प्रत्येकाचे कान आसुसलेली असतात. दुसऱ्याच्या यशाची चर्चा करायला मन फार मोठे असावे लागते.

आपल्याला दुसऱ्याचे यश, विशेष काही वाटत नाही किंवा आपल्याला ते बघवत तरी नाही, म्हणून आपण स्वतः सुद्धा त्याच्यावर होणारी चर्चा अनेक वेळा टाळत असतो. याच्या उलट एखाद्याचे अपयश विनाकारण आपल्या आनंदाचा विषय बनतो आणि तो गरज नसताना चर्चेचा विषय होतो. आपल्या बरोबर चर्चा करणारीही अशीच आपल्यासारखी सर्वसाधारण माणसे असतात, त्यामुळे ही दोन्ही ठिकाणी विकृती आहे, याचे कोणालाच भान नसते.

जी गोष्ट आपल्याला आवडते, तीच दुसऱ्यालाही आवडत असते आणि जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती दुसऱ्यालाही आवडणार नाही, हा साधासरळ सिद्धांत आहे, त्यामुळे दुसऱ्याला आवडेल ते द्यावे आणि दुसऱ्याला आवडणार नाही ते टाळावे, हे कळतंय पण वळत नाही कारण वळायला असाधारण बनावे लागते, म्हणजेच आपल्यात विशिष्ट बदल करूनच आपले श्रेष्ठत्व सिद्ध होत असते. तो बदल साधा आहे परंतु आचरणात आणायला महाकठीण आहे.

प्रयत्न करून पहा यात यश आले, तर समाज आपल्यावर भरभरून प्रेम करतो. यशाची चर्चा जर प्रत्येकाला आवडत असेल, तर ज्या ठिकाणी जाल, ज्यांना भेटाल, त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनातील यश यावरच चर्चा करा. समोरचा माणूस तोंडभरून तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या पश्चात तुमच्याबद्दल एक शब्दही वाईट बोलणार नाही.

अशा भेटीत चुकूनही स्वतःबद्दल आणि स्वतःच्या यशाबद्दल बोलू नका कारण आपल्या स्वतःच्या यशाबद्दल स्वतः चर्चा करणारा माणूस कोणालाही आवडत नाही.

दुसरे पथ्य पाळा की त्याच्या जीवनात आलेले अपयश याबद्दल एक शब्दही बोलू नका. सर्व काही माहीत असूनही आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही अशा भावनेत रहा. आपण त्याच्यापुढे त्याच्या अयशाबद्दल बोलू लागलो, तर त्याच्या मनाला ते शब्द टोचणारे आणि लागणारे असतात, त्यामुळे तो कमालीचा दुखावला जातो, म्हणून *माहित असूनही त्याबद्दल मौन पाळणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.

आपल्याला जेवढे माहीत असते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहीत आहे, असे दाखवण्याचा मूर्खपणा आपण प्रत्येक चर्चेत करत असतो, म्हणून आपले बोलणे दुसऱ्याला आवडत नाही. तो स्वतःहून आपल्या जीवनात आलेल्या अपयशाबद्दल तुम्हाला सल्ला मागत असेल, त्या योग्यतेचे तुम्हाला समजत असेल, तर त्याला जरूर मार्गदर्शन करावे परंतु मार्गदर्शन करत असताना सुद्धा त्याच्याजवळ चांगले काय आहे⁉️ याचा वारंवार उल्लेख करून त्याकडे निर्देश करावा.

तुझे काय चुकीचे आहे⁉️ आणि काय वाईट आहे⁉️ हे आपल्याला तेवढा अधिकार असल्याशिवाय बोलू नका.

समाजात आपल्या बोलण्याला किंमत असावी, असे प्रत्येकाला वाटत असते, तर त्यासाठी आपले स्वतःचे यश सोडून कोणाच्याही यशावर चर्चा करत रहा आणि आपले अपयश सोडून दुसऱ्याच्या अपयशावर कायम मौन बाळगा.

बोलू ऐसे बोले l जेणे बोले विठ्ठल डोले ll
प्रेम सर्वांगीचे ठायी l वाचे विठ्ठल रखुमाई ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment