कर्तव्य आणि जबाबदारी –
आपले कर्तव्य आणि जबाबदारी विसरणारी माणसे ही फक्त स्वार्थी असतात. आपल्या जीवनात सुखदुःख यश-अपयश हे येतच असते, पण कोणत्याही काळात आपली जबाबदारी आणि कर्तव्य विसरून चालत नाही.
जो कोणत्याही अवस्थेत आपले कर्तव्य आणि जबाबदारी या ठिकाणी जागा असतो, समाज त्याच्याकडे आपोआप नेतृत्व देतो कारण हा असामान्य गुण आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये आपली जबाबदारी आणि कर्तव्य हेच त्यांचे सर्वस्व होते. अफजलखानाला भेटायला जाण्यापूर्वी शिवरायांच्या मुखामध्ये एक वाक्य आले होते,” आम्ही जर कामी आलो तर संभाजीला गादीवर बसवा आणि माँसाहेब व नेताजी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सांभाळा !” हे वाक्य त्यांच्या कर्तृत्वाची आणि जबाबदारीची जाणीव करून देते.
ज्यावेळी आपण फक्त आपला विचार करत असतो त्यावेळी आपल्याला आपल्या जबाबदारीचा आणि कर्तव्याचा विसर पडतो. दुसऱ्यांचा विचार विसरणे म्हणजे जबाबदारी टाळणे असते. जबाबदारी टाळली की कर्तव्याचा विसर पडतो. केवळ मजा मारण्यासाठी एकत्र आलेल्या माणसांना याचा विसर पडतो.मजा मारून झाल्यानंतर याची फार मोठी किंमत या लोकांना मोजावी लागते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनचरित्रामध्ये स्वतः लिहून ठेवले आहे, मी वडिलांची ते आजारी असताना सेवा करत होतो. त्यांच्या अंतिम क्षणी मी त्यांच्याजवळ असणे अपेक्षित होते परंतु मी माझ्या पत्नीच्या मोहात पडलो आणि अंतिम क्षणी त्यामुळे माझी जबाबदारी आणि कर्तव्य याला विसरलो. मला या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप होत आहे, मी स्वतःला याबाबतीत कधीच माफ करू शकलो नाही.
आपल्या आयुष्यामध्ये मौजमजा करण्याचे प्रसंग अनेक येतात. अशावेळी आपण आपले कर्तव्य आणि जबाबदारी याचे स्मरण करावे आणि त्या दोन्ही गोष्टी सांभाळून जरूर मौजमजा करावी, त्यामुळे पश्चातापाची वेळ कधीच येत नाही.
व्यसन आणि व्याभिचार या दोन्ही गोष्टीत माणूस आपली सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी पूर्ण विसरलेला असतो. त्यातून बाहेर पडण्याचा विचार अनेक वेळा अशा व्यक्तींच्या मनात येतो, पण घसरलेली पत आणि प्रतिष्ठा याच्यामुळे नैराश्य येऊन माणूस पुन्हा त्यात खोल खोल बुडत जातो. आपल्या आयुष्यातील कोणतीही मौज मजा ही जबाबदारीच्या आणि कर्तव्याच्या कुंपणातच सुरक्षित आणि लाभदायक असते. हे कुंपण नसेल तर,
त्याचा होय भूमीभार l नेणे यातीचा आचार l झाला दावेदार l भोगवी अघोर पितरांशी ll
आपली कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, नैसर्गिक आणि धार्मिक जबाबदारी आपल्याला कधीच टाळून चालणार नाही.
डॉ आसबे ल.म.