एकटा जीव | Ekata Jiv Book

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
एकटा जीव | Ekata Jiv Book

एकटा जीव –

माणसाचं आयुष्य, त्याचं जगणं हा नेहमीच चिंतनाचा विषय ठरला आहे. त्यातही यशस्वी माणसाच्या आयुष्याविषयी प्रत्येकालाच कुतूहल असतं. त्याचं जगणं जाणून घेण्याची उत्कंठा असते. अशा माणसांचं ऐश्वर्य, वलय, प्रसिद्धी जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय बनते. अर्थात इतकं सारं मिळूनदेखील अशांसाठी कुठली न् कुठली खंत, सल, शल्य मागं शिल्लक उरतंच.एकटा जीव.

दादा कोंडके यांचं ‘एकटा जीव’ हे आत्मचरित्र हे सारं चित्र अधोरेखित करणारं आहे. अनिता पाध्ये या महिला पत्रकारांनी ते शब्दांकित केलं आहे. मार्च 1999 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तकात आलेले खासगी जीवनातले संदर्भ यामुळं ते खळबळजनक ठरलं. कायद्याच्या कचाट्यातही सापडलं. अर्थात त्याची वाचकप्रियता, लोकप्रियता कायम राहिली. त्यामुळंच त्याच्या कित्येक आवृत्त्या येत राहिल्या.

दादा कोंडके म्हणजे एक अफलातून रसायन. हजरजबाबी व्यक्तिमत्त्व, विनोदी अभिनेता, चतुरस्त्र लेखक, यशस्वी निर्माता, दिग्गज दिग्दर्शक हे त्यांचे विविधांगी पैलू. दादा या नावालाच जणू परिसस्पर्श लाभला होता. त्यामुळेच त्यांचे सारेच चित्रपट रोैप्यमहोत्सवी ठरले. दादा म्हणजे विनोद, द्वयर्थी संवाद, गीतं असंही समीकरण रूढ झालं. याच दादांचं व्यक्तिगत आयुष्य कित्येक खाचखळग्यांनी भरलेलं होतं. ते शून्यातून पुढं आले. त्यांनी स्वकर्तृत्वानं स्वतःच विश्व उभं केलं. पैसा, प्रसिद्धी, वलय सारंकाही उपभोगलं. अर्थात इतकं सारं मिळूनही दादा शेवटी एकटेच उरले. त्यामुळं ‘एकटा जीव’ हे आत्मकथनाचं शीर्षक त्यांच्या जगण्याचं सार ठरलं.

अगदी दादांच्या शब्दांतच सांगायचं झालं तर-

माझं दु:ख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो. अशी ब-याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं. पुढल्या जन्मी देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे.

दादांचे फारसे चित्रपट मला पाहता आले नाहीत. मात्र त्यांचं गाव असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या इंगवली (ता. भोर) इथं जाणं घडलं. तिथंच नजीक असलेल्या ‘नेकलेस पाॅईंट’वर मी कितीदा तरी गेलो. माझ्या मित्रांनाही बरोबर घेऊन गेलो. अर्थात प्रत्येक वेळी तिथं दादांचं नाव निघालं.  ‘एकटा जीव’ची आठवण झाली.

पुस्तकाचं नाव। एकटा जीव
लेखक। दादा कोंडके (शब्दांकन: अनिता पाध्ये)
प्रकाशन। अनुबंध प्रकाशन
पृष्ठसंख्या। 408
किंमत। 360 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment