रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

By Bhampak Travel 3 Min Read
रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती –

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे :

‘चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा। दहावा जाणावा माजगांवीं॥ बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा। सर्व मनोरथा पुरवील॥ वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥’

उंब्रज –
कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज (सातारा) येथे शके १५७१ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे.

चाफळ –
येथे दोन मूर्ती आहेत. या गावी शके १५७० मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस दास मारुती म्हणतात. ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे. प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे.

पारगाव –
मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरचे.हे गाव कर्‍हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुना पारगाव येथे शके १५७४ मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे.

बत्तीस शिराळे –
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे शके १५७६ मध्ये समर्थांनी मूर्ति स्थापना केली. येथील मारुतीची मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख आहे.

बहे बोरगाव –
हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात ‘रामलिंग’ नावाचे बेट आहे.तेथील ‘राम’ मंदिराच्या मागे शके १५७३ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.

मनपाडळे –
येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना – शके १५७३.

मसूर –
येथे शके १५६७ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास महारुद्र हनुमान म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीट्य़र आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.

माजगांव –
चाफळहून उंब्रज जाणार्‍या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दूर माजगांवी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.

शहापूर –
कर्‍हाड-मसूर रस्त्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनार्‍यावर स्थापिलेली मूर्ती. जवळपास ६ फूट उंच मूर्ती. ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

शिंगणवाडी –
येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. ही जागा चाफळच्या नैर्ऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.

समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.

Leave a comment