प्रोत्साहन | Encouragement –
एखाद्याला प्रोत्साहन | Encouragement देण्यासारखे या जगात दुसरे पुण्य नाही मदत करणाऱ्याला अहंकार निर्माण होऊ शकतो आणि मदत घेणारा, त्याची सवय लागली तर दुबळा होऊ शकतो . कौतुक करणाऱ्याचा हेतू स्पष्ट नसतो ,पण प्रोत्साहीत करण्याच्या क्रियेत यातले काहीच नसते, म्हणून एखाद्याला प्रोत्साहीत करण्यासारखी सेवाही नाही.
प्रोत्साहन देण्यासाठी पैसेही लागत नाहीत आणि कष्टही लागत नाहीत, फक्त मन निःस्वार्थी शुध्द असावे लागते यात स्वतः काहीच करायचे नसते, त्यामुळे अहंकार निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही आणि यातला हेतूही स्पष्टपणे परोपकारच असतो , त्यामुळे धोका देण्याचा आणि घेण्याचाही संबंध येत नाही. फक्त याचा चांगला परीणाम दिसावा, यासाठी काही पथ्य पाळावे लागते, ते म्हणजे आपले प्रोत्साहन हे गैरमार्गाला लावणारे नसावे, कारण बिघडायला एखादी घटना कारण ठरते आणि त्याला प्रोत्साहन देणारे महाकारण ठरतात आणि तो पूर्ण बिघडल्यावर आपण हे विनाकारण केले असा पश्चात्ताप करून काहीही उपयोग होत नाही .
दुसरे पथ्य म्हणजे आपण एखाद्याला प्रोत्साहन देताना पूर्ण निःस्वार्थी असतो , पण त्याचा परीणाम जर अत्युच्य दिसला , तर मात्र त्याचे श्रेय घेण्याचा स्वार्थ निर्माण होऊ शकतो आणि हा उफाळून आला की ज्याला आपण प्रोत्साहीत केले आहे , त्याच्याही मनातून आपण उतरतो .
आजच्या वातावरणात तर प्रोत्साहीत करणारे कमी, यशस्वी होणारे त्याहून कमी, पण यश दिसताच श्रेय घेणारे मात्र भरमसाठ असे चित्र सगळ्याठीकाणी दिसते आहे .
माँसाहेब जिजाऊंचे जीवन हे अखंड प्रोत्साहनाचा झरा आहे, तो आजही वहात आहे, बाबारे अंग राखून युद्ध जिंकता येत नाही आणि कर्तुत्व घडत नाही, त्यांचे हे वाक्य शिवबासाठी असेल , पण त्याचा गर्भित अर्थ, जो पर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत प्रत्येक तरूण आणि तरूणीला अखंड प्रोत्साहन देत राहील .
⁉️आपल्या मुलांना आपण शिक्षण देत आहोत , ⁉️त्यांच्या गरजा पूर्ण करत आहोत , ⁉️त्यांच्या भविष्यासाठी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आणि वैयक्तिक आशाअपेक्षांचा चुराडा करून जमेल तेवढे मिळवून ठेवत आहोत , पण प्रोत्साहीत करणे विसरत चाललो आहोत.
आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारूया कि मी आज कोणाला प्रोत्साहीत केले? निःस्वार्थी आणि शुध्द अंतःकरणाच्या व्यक्तीलाच हे शक्य आहे , बाकीच्यांनी या भानगडीत पडू नये.
डॉ .आसबे ल.म.