काही माणसे मरावीत किंवा मेलेली कळावीत असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते…

By Team Bhampak Articles Laxman Asbe 3 Min Read

काही माणसे मरावीत किंवा मेलेली कळावीत असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते त्याला सामान्य माणसात कोणी अपवाद नाही.
मुंगीला मारणेही पाप समजणाऱ्या माणसाच्या मनातही हे विचार येतात. त्यात वैरी, शत्रू , त्रासदायक माणसाचा क्रमांक नेहमी वरचा असतो . बरं आपल्या मनात मेलेला कळावा असा माणूस सतत घर करून राहिलेला असतो , तो सतत आपले मानसिक स्वास्थ्य
खराब करत असतो, कितीही प्रयत्न करा तो मनातून जात नाही आणि आपल्या मनाने ठरविल्याप्रमाणे मरतही नाही , उलट तो हळुहळु आपल्यालाच मारत असतो . ही आपल्या मनातील हिंसक वृत्ती हा आपला दोष आहे, त्यात समोरचा माणूस आपण मनात धरून ठेवलेला असतो , त्याला याची कल्पनाही नसते.

असा मनाला त्रासदायक ठरणारा माणूस मनात धरून ठेवणे आणि त्याचा त्रास करून घेणे म्हणजे उलटी येणारे औषध घेऊन मला मळमळतेय ! अशी ओरड करण्यासारखे आहे . उलटी जेवढी दाबून आणि पकडून ठेवाल तेवढी मळमळ आणि त्रास वाढतो .
उलटी केल्याशिवाय हा त्रास थांबत नाही तसे मनातला त्रासदायक माणूस मनातून काढून टाकल्याशिवाय हा त्रास आणि दोष जात नाही.
हे मनातले काढणे खूप अवघड आहे, अगदी देव सुध्दा याला अपवाद नाही, आपण तर साधी माणसे आहोत.

संत तुकाराम महाराज म्हणतात ,
घेऊनिया चक्र गदा ।
हाच धंदा करितो ।।
भक्ता राखी पायापाशी ।
दूर्जनाशी संहारी ।।
याचा अर्थ देवाच्या मनातला दूर्जन देव संपवूनच टाकतो. शत्रू संपविणे सोपे आहे , पण शत्रूत्व संपविणे खूप अवघड आहे , म्हणून
शत्रू संपविणाऱ्याला वीर म्हणतात तर शत्रूत्व संपविणाऱ्याला महावीर म्हणतात . असे महावीर या जगात फक्त संत आहेत म्हणून देवापेक्षाही संत मोठे समजले जातात .

संत म्हणतात ,
जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मे रती वाढो ।।
याचा अर्थ संत म्हणतात वाईट माणसांचा फक्त वाईट गुण मरावा आणि तो सत्कर्मी व्हावा, तोही जगला पाहिजे . जगातील प्रत्येक माणूस जगला पाहिजे, ही संत वृत्ती आहे आणि आपल्याला त्रासदायक माणूस मेला पाहिजे ही आपल्या सामान्य माणसाची वृत्ती आहे .
ही वृत्ती जाण्यासाठी संतच व्हावे लागेल, तोपर्यंत आपण मनात अशी असंख्य माणसे मारतच राहणार आणि मानसिक हिंसा करतच राहणार मग बाहेर कितीही सभ्यतेचे ढोंग आणले तरी आपल्याला ते कमीच पडणार .

– डॉ . आसबे ल.म.

Leave a comment