कौतुकाची अपेक्षा

By Bhampak Articles Entertainment Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

कौतुकाची अपेक्षा –

प्रत्येक माणसाला कौतुकाची अपेक्षा असते. संत, संन्यासी, साधू आणि योगी यांचा अपवाद वगळता प्रत्येकाला कौतुक आवडते. लहानपणी आपल्या आई वडिलांनी केलेले कौतुक आयुष्यभर लक्षात राहते. तारुण्यात मित्र-मैत्रिणींकडून कौतुकाची अपेक्षा असते आणि संसारी जीवनात आपली धर्मपत्नी, मुले यांच्याकडून अपेक्षा असते. या कौतुकाच्या जीवावरच आपला उत्साह टिकत असतो.

मरगळलेल्या मानसिक अवस्थेला कौतुकाची क्षण आठवले तरी मरगळ झटकून जाते. त्यामुळे कौतुकाची अपेक्षा गैर नसते. इतर कोणाकडून झाले नाही तरी आपल्या मित्रांकडून ते निश्चित होत असते. खरे मित्र आपल्या चुकाही दाखवितात आणि मन भरून आपले कौतुकही करीत असतात.

आपण व्हाट्सअपवर टाकलेली एखादी पोस्ट, त्याला मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स, यात मित्रांचा सहभाग आणि योगदान सर्वात प्रधान असते. आपल्याला सर्वात जास्त मित्रांच्या कमेंट्स आणि लाईक आवडतात, याला कोणीही अपवाद नाही. काळजी फक्त एवढीच घ्यायची असते की त्यातून तुलना  सुरू होऊ नये.

मैत्रीमध्ये तुलना सुरू झाली की भेद निर्माण होतो, हा भेद श्रेष्ठ आणि कनिष्ठतेपर्यंत जाऊन पोहोचतो. मित्रातील मनमोकळेपणाचा परिणाम या भेदाला एकमेकांच्या लायकी पर्यंत पोहोचवतो. मैत्रीमध्ये ही गोष्ट प्रत्येक मित्राने जाणीवपूर्वक टाळायला हवी.

आपली कौतुकाची अपेक्षा ही आपल्या मित्राला तुलना करायला तर भाग पडत नाही ना ? याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. आपल्या सर्वांच्या जीवनात मित्र आणि मैत्री इतके मौल्यवान काहीच नाही. आपल्या मित्राच्या यशात, आपल्याला होणारा आनंद, आपण प्रत्येक जण व्यक्त करत असतो आणि हे व्यक्त होणे अतिशय निरपेक्ष आणि प्रामाणिक असते, म्हणूनच याची किंमत अमूल्य असते.

आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, की देवाने आपल्या प्रत्येकाला स्वतंत्ररित्या आणि विशेषत्वाने वेळ देऊन बनविलेले आहे. जगामध्ये आपल्या सारखी दुसरी व्यक्ती कोठेही नाही, आपल्यासारखे फक्त आपणच आहोत. ज्या व्यक्तीला हे स्वतःचे स्वरूप कळाले, तो आयुष्यात कधीही दुसऱ्याशी तुलना करत नाही. यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि हे अंतर्मुख झाल्याशिवाय कळत नाही.

सद्गुरूकृपा आपल्याला या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. जी माणसे बहिर्मुख असतात, तिच सतत आपली तुलना इतरांशी करत राहतात आणि कायम अस्वस्थ, अशांत व दुःखी राहतात. अशा लोकांना आपल्या स्वतःची किंमत कधीच कळत नाही. चार वेदांची चार महावाक्ये आहेत,

अहं ब्रह्मास्मि l तत्वमसि l आयम आत्मा ब्रम्ह l प्रज्ञा नाम ब्रम्ह l

धर्मशास्त्रातील काही माहीत नसले चालेल, परंतु ही चार महावाक्ये आपल्याला माहीत असली पाहिजेत आणि समजलीच पाहिजेत. या महावाक्यातून होणाऱ्या बोधातून झालेले कौतुक, हेच खरे कौतुक असते आणि आपल्या मित्रांबद्दल तर जरूर आपल्याला ते मनमोकळेपणाने करता आले पाहिजे.

तुका म्हणे एका मरणेची सरे l
उत्तमची उरे किर्ती मागे ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment