अमर्याद शक्तीचा अनुभव

bhampak-banner

अमर्याद शक्तीचा अनुभव –

आपल्या मर्यादा प्रत्येकाला माहीत असतात. आपल्या बुद्धीच्या, शक्तीच्या, आर्थिक परिस्थितीच्या मर्यादेतच माणूस स्वतःला सुरक्षित समजत असतो. वास्तविक या मर्यादा आपण अनुभवाने ठरवलेल्या असतात आणि आपले अनुभव हे नेहमी शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आर्थिक पातळीवरील असतात, त्यामुळे हे पूर्ण सत्य नसते. जोपर्यंत आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणत नाही, तोपर्यंत आपल्याला आलेले अनुभव अर्धवट असतात. ते बहिर्मुख अवस्थेत आलेले अनुभव म्हणजे अर्धसत्य असते, पूर्ण सत्य काही वेगळेच असते.अमर्याद शक्तीचा अनुभव.

या जगात जे काही महामानव जन्मले, ते सर्व सगळ्याच बाबतीत जन्मतः आपल्या सारखेच सर्वसामान्य होते. आपल्यातील अमर्याद शक्तीचा ज्यांना वेळेत अनुभव आला आणि त्या शक्तीची ओळख पटली, ती माणसे महान बनली. आपल्यातील अमर्याद शक्तीला ज्या दिशेला त्यानी वळविले, त्या दिशेला त्यांच्या कर्तुत्वाचा हिमालय उभा राहिला.

काही राजकारणामध्ये काही समाजकारणामध्ये काही खेळांमध्ये, काही अभिनयामध्ये, काही लिखाणामध्ये. काही वक्तृत्वामध्ये, काही सौंदर्यामध्ये, काही कलेमध्ये, काही विज्ञानामध्ये. काही धर्मकार्यात तर काही साधनेमध्ये आणि आत्मज्ञानामध्ये सर्वोच्च ठरले. या सर्वांच्या मध्ये माणूस म्हणून जन्म घेण्याची क्रिया आणि जन्म आपल्यासारखा समानच आहे. यातील काही महामानव अध्यात्मिक नसले तरी त्यांच्या अलौकिक कार्याच्या तळाशी त्यांच्या *अत्यंतिक बुध्दी,धाडस आणि कष्टाबरोबरच त्यांच्यातील अमर्याद शक्ती आहे.

जगातील सर्व व्यक्तींचा मृत्यू समानच आहे, फक्त मृत्यू येण्याची कारणे भिन्नभिन्न आहेत, परंतु मृत्यूत काहीच फरक नाही. भगवान परमात्म्याने आपल्या सर्वांना समान वाटप केलेले आहे. दुर्दैवाने बहिर्मुख झालेल्या माणसांना आपल्यातील अमर्याद शक्तीचा अनुभव कधीच येत नाही. अशी माणसे आपल्या बहिर्मुख अनुभवानुसार आपल्या मर्यादा ठरवून घेतात आणि या मर्यादेच्या बाहेर जगणे त्यांना मान्य नसते. अशा मानसिकतेची माणसे कधीच कोणत्याही क्षेत्रात मोठी होऊ शकत नाहीत, असू शकत नाहीत कारण त्यांच्या मर्यादा त्यांना बांधून ठेवतात.

जगातील प्रत्येक महान व्यक्तीचा उदय, हा शून्यातूनच आहे, हे सत्य अशा माणसांना पटत नाही. आपण भगवान परमात्म्याच्या अमर्याद शक्तीचे अंश आहोत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपल्यात असलेली ही अमर्याद शक्ती जाणून घेणे, ही खरे तर आपल्या शिक्षणव्यवस्थेची पहिली पायरी असायला हवी. भारतीय संस्कृतीमध्ये याजसाठी पहिल्यांदा गुरुकुलात प्रवेश करत असताना, त्या व्यक्तीला अनुग्रह दिला जात होता आणि गुरुशिष्य परंपरेने सर्वात प्रथम आत्मज्ञानाचे शिक्षण दिले जात होते.

आपल्या आत्मशक्तीच्या अमर्याद क्षमतेचा साठा ज्याला सापडला, त्याला स्वतःसाठी जगणे ही फार किरकोळ गोष्ट ठरते. अशी आत्मशक्तीचा परीचय झालेली व्यक्ती, विश्वाचे कल्याण करण्याचा संकल्प करीत असते आणि त्यासाठीच माझा जन्म आहे ! ही त्याची प्रतिज्ञा ठरते.

आज कोणत्याही शिक्षण पद्धतीत आत्मज्ञानाचा अंतर्भाव नाही, त्यामुळे शिक्षित झालेली सगळी पिढी आपल्या आत्मशक्ती पासून अपरिचित राहतेय आणि त्यामुळे सर्वकाही आपल्या जवळ असून स्वतःला कंगाल आणि भिकारी समजतेय. पूर्व पुण्याईने, सत्संगतीने आणि संस्काराने काहींना आत्मज्ञानाची जिज्ञासा निर्माण होते, त्यातील काहींना श्री गुरुकृपा होते आणि फार थोड्या लोकांना आपल्या साधनेवर विश्वास बसतो आणि त्यामुळे अतिशय कमी लोकांना आत्मज्ञान होते. हे सर्व घडेपर्यंत बऱ्यापैकी वय निघून जाते, म्हणून जगात महामानव हे नेहमी संख्येने अतिशय अल्प राहतात.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहिले ध्येय, हे आत्मज्ञानच असायला हवे.

कास घालोनि बळकट l झालो कळिकाळावरी नीट l केली पाटवाट भवसिंधुवरूनी ll
यारे यारे लहानथोर l याती भलती नारी नर l करावा विचार l नलगे चिंता कोणाशी ll

ही खरी आपली ताकद आहे आणि हे खरे आपल्या शक्तीचे अमर्याद स्वरूप आहे. माझ्या जीवनात कोणतीच मर्यादा नाही, मी अमर्याद आहे ! हा प्रत्यक्ष अनुभव म्हणजेच मुक्ती आहे.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment