प्रसिद्धी चा धोबीपछाड | Fame | Publicity

bhampak-banner

प्रसिद्धी चा धोबीपछाड –

माणसाचे आयुष्य हे यश-अपयश, पाप-पुण्य सुख-दुःख यांच्या खेळाने भरलेले आहे. व्यवहारिक जीवनातील अवस्था ही कधीच स्थिर नसते, म्हणूनच तिला परस्थिती म्हणतात, जी कधीच आपल्या हातात नसते. प्रसिद्धी चा मोह असलेल्या माणसाला, आपण केलेल्या छोट्यात छोट्या कामाचीही दखल समाजाने घ्यावी, अशी अपेक्षा असते. दखल घेण्यासारखे कर्तुत्व किंवा कार्य आपल्या हातून घडले, तर समाज त्याची निश्चित दखल घेतो.

समाजाची परीक्षा, ही नेहमी निरपेक्ष, निष्पक्ष आणि सर्वोत्तम असते, म्हणूनच ती सर्वात प्रभावी असते. आपल्या ज्या कामाची दखल समाज घेत असतो, त्या कामासाठी पेपरबाजी, व्हाट्सअप, फेसबुक याचा आधार घ्यावा लागत नाही, फक्त आपल्याला धीर नसतो. त्यामुळे आपण समाजाच्या प्रतिक्रियेसाठी उतावळे झालेले असतो.

आपला हा उतावळेपणाच आपल्यात प्रसिद्धीचा मोह निर्माण करतो. हा प्रसिद्धीचा मोह आपल्याला पेपरबाजी, व्हाट्सअप, फेसबुक याचा आधार घ्यायला भाग पाडतो. अशा माध्यमातून प्रसिद्ध पावलेला माणूस नकळत अहंकारयुक्त आणि गर्विष्ठ बनतो.

परिस्थिती कधीही आपल्या हातात नसते, ती ज्यावेळी प्रतिकूलतेकडे झुकते, त्यावेळी आपली पेपरबाजी, व्हाट्सअप, फेसबुक ही माध्यमेच आपल्या गळ्याचा फास बनतात. स्वतःहून केलेली प्रसिद्धी हीच आपली सर्वात जास्त नाचक्की ठरते. आपल्या प्रतिकूल काळात, समाज आपण केलेल्या प्रसिद्धीकडे बोट दाखवितो, त्यावेळी आपल्याकडे मुग गिळून गप्प बसण्यापलीकडे हातात काहीच नसते.

आपण स्वतः प्रसिद्ध न केलेले काम आणि त्याची समाजाने घेतलेली दखल, ही कायम स्वरूपाची असते. अनुकूल काळात समाज आपले कौतुक करत असतो आणि प्रतिकूल काळात आपण केलेल्या कामाची दखल घेऊन आपल्याला धीर देत असतो. प्रसिद्धीचा मोह टाळलेल्या माणसाच्या जीवनात हा सर्वात मोठा फायदा असतो.

छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या जीवनात कधीही स्वतः प्रसिद्धी केली नाही. समाजाने त्यांच्या कर्तृत्वाचे आणि कार्याची दखल घेतली. मुर्दाड झालेला हा समाज शिवरायांच्या प्रतिकूल काळात शिवरायांसाठी स्वतःचे प्राण अर्पण करायला तयार झाला. अनेकांनी या प्रसिद्धीपराःडमुख, कर्तुत्वान राजासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे.

शिवरायांच्या मृत्यूनंतर, संभाजी राजांच्या मृत्यूनंतर, मोगलांचे वैर पत्करून महाराणी चन्नम्माने छत्रपती राजाराम महाराजांना आसरा दिला आणि तलवार उपसून मोगलांचा पराभव केला.

प्रसिद्धीचा मोह, आपल्या जीवनातील सामाजिक स्थानाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्याला हा शत्रू वेळीच ओळखता येत नाही, त्याची शिकार झाल्याशिवाय रहात नाही मग तो कोणीही असो. ज्याला हा शत्रू वेळेत ओळखता आला आणि त्याला संपविता आले, त्याचे सामाजिक स्थान अबाधित राहते, मग त्याची परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो.

निर्वातिचा दिपू सर्वथा नेणे कंपू l
तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त ll

डॉ. आसबे ल.म.
अध्‍यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment