जीवन | Final Destination

bhampak-banner

जीवन | Final Destination –

मरणाची आठवण चाहूल स्पर्श कल्पना माणसाला कल्पनेतील सरणावर घेऊन जात असतात आपल्या प्रत्येकाच्या जीवन प्रवासाचे FinaL desTination तेच आहे याची जाणीव माणसाला जीवन किती अनमोल आहे⁉️ याची अनुभूती देते .

मृत्युची जाणीव जीवनात खूप महत्वाची आहे, कारण सरणावरून उतरलेली माणसे वेगळी असतात, बदललेली असतात आणि असामान्य कार्य करतात, कारण बोनस मिळालेले आयुष्य ⁉️किती अनमोल आहे ⁉️ याची किंमत त्यांना माहीत होते .

माँसाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी या माता सती जाण्यासाठी सरणावर चढलेल्या होत्या, एकीला आपल्या पुत्राने आणि दुसरीला आपल्या सासऱ्याने सरणावरून खाली उतरवले आणि त्यानंतरचे त्या दोघींचे आयुष्य किती असामान्य आणि महान आहे? हा ऐतिहासिक पुरावा आहे .

वयाच्या आठव्या वर्षी मगरीच्या तोंडातून सुटलेले शंकराचार्य पुढे फक्त चौवीस वर्षेच जगले , पण अनंतकाळापर्यंत त्यांना कोणी विसरू शकणार नाही. तसे पाहिले तर मरण प्रत्येकासाठी निश्चित आहे, पण त्याची वेळही तितकीच अनिश्चित आहे, त्यामुळे जगलेला/जगत असलेला प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी बोनस आहे , हे ज्याला समजते आणि उमजते , त्याला मृत्यूचे भय रहात नाही आणि निर्भय जीवन थोडे असले तरी अर्थपूर्ण झाल्याशिवाय रहात नाही .

मृत्यूचे स्वागत करता आले पाहिजे , रडत , खडत , पाय घासत यमाबरोबर जाण्याऐवजी , आनंदाने त्याचे बोट धरता आले पाहीजे , कारण वेळ आल्यावर त्याच्याबरोबर जावेच लागते* फक्त जाण्याच्या अवस्थेत बदल करणे आपल्या हातात आहे . जो मिळालेले आयुष्य निर्भय जगतो, तोच काहीतरी आपल्या जगण्याची खूण निर्माण करतो , तोच कोणत्याही क्षणी मृत्यूचे स्वागत करू शकतो , कारण त्याने मृत्यूला सतत बरोबर वागवलेले असते आणि मिळालेले बोनस होते हे त्याला समजलेले असते .

आयुष्याचा प्रत्येक क्षण बोनस आहे, निर्भय होणे आपल्या हातात आहे.

डॉ.आसबे ल.म.

Leave a comment