किल्ले गोकाक –
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक या तालुक्याच्या गावी जवळच टेकडीवर एक किल्ला आहे. गोकाक हे घटप्रभा नदीवर असलेल्या धबधब्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. गोकाक धबधब्याला “मिनी नायगरा” म्हणून ओळखले जाते. गोकाक हे शहर बेंगलोर महामार्गावरील संकेश्वरपासून साधारण ४५ कि.मी अंतरावर आहे. सध्या किल्ल्याचे छोटेसे प्रवेशद्वार, तटबंदी आणि पायरी मार्ग पहायला मिळतो. गडावर पीराचे स्थान असल्याने भाविकांची गर्दी असते. मलिकसाहेबांचा पीर आहे. गडावरून गोकाक शहर, मलप्रभा- मार्कंडेय नदीचा संगम दिसतो.
गोकाकच्या किल्ल्याचे बांधकाम विजापूरच्या आदिलशहाच्या कारकीर्दीत झाले. इ.स. १६८५ मध्ये औरंगजेबाचा मुलगा शाहआलम याने गोकाक- धारवाडमार्गे संभाजीराजांवर दक्षिणेत स्वारी केली पण मराठ्यांच्या सततच्या आक्रमणामुळे तो माघारी फिरला. नंतर हा परिसर सावनुरच्या नवाबाच्या ताब्यात गेला. तो परत मिळविण्यासाठी सदाशिवरावभाऊ महादजीपंत पुरंदरेंसोबत ५ डिसेंबर १७४६ रोजी मोहीमेवर गेले आणि नवाब आणि देसाईंवर जरब बसविला.
नवाबाकडून गोकाक, कित्तूर, तोरगल, नारगुंद, पाच्छापूर, बागलकोट, परसगड, बसवपट्टण असे २२ परगणे ताब्यात आले. पुढे कित्तूरकर देसाईंनी इ.स. १७७८ साली गोकाक ताब्यात घेतले पण पुन्हा इ.स. १७७९ ला तो परत घेवून देसाईंना कैद केले. पुढे हा किल्ला आणि परिसर पटवर्धन, करवीरकर छत्रपती, टीपू यांच्या ताब्यात होता.
साभार – सुरेश निंबाळकर.
टीम – पुढची मोहीम