किल्ले होन्नुर

किल्ले होन्नुर

किल्ले होन्नुर –

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाला लागून असलेला हा किल्ले होन्नुर. छोट्याश्या टेकडीवर होन्नुरचा किल्ला आहे. ह्याला पवित्र डोंगर किंवा पायझर डोंगर ह्या नावाने ओळखले जाते. होन्नुरचा किल्ला बेंगलोर महामार्गावरील संकेश्वरपासून २५ कि.मी अंतरावर आहे. संकेश्वर – गोकाक रस्त्यावर हिडकल धरणाला लागून हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला हा महत्त्वपूर्ण किल्ला होता.

गडाची तटबंदी लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. जांभा खडकाचे चिरे वापरून किल्ल्याचे बांधकाम केले आहे. तटबंदी आजही मजबूत आहे. गडाचे बांधकाम त्रिकोणी आहे. गडाच्या आतमध्ये असलेल्या वास्तूंचे तुरळक अवशेष पहायला मिळतात. विहीर आहे पण ती कोरडी आहे. विहीरीची भिंत इ.स. १८०० मध्ये वीज पडून पडली. गडाकडे दुर्लक्ष असल्याने काटेरी, खुरटी झाडे बरीच वाढल्याचे दिसून येते.  बुरूजावर भगवा डौलाने फडकतो. किल्ल्यावर जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. गडावरून हिडकल धरण, गोकाकचा महामार्ग असा परिसर दिसतो.

किल्ल्याच्या बाबतीत ऐतिहासिक घटना घडलेली नाही. किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. बेळगावातील इतर किल्ल्यांप्रमाणे इ.स. १८४४ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांच्या इ.स. १८५३ मधील नोंदीनुसार गडाला एकही अखंड बुरूज नाही,थोडीफार तटबंदी शिल्लक आहे.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment