मैत्री | Friendship

bhampak-banner

मैत्री | Friendship –

मैत्री सर्वांशी करावी पण कोणातही गुंतू नये तरच आपल्याला सुखाने जगता येते. आपण ज्याच्याशी मैत्री करतो त्याच्याशी मैत्रीचे संबध ठेवण्यासाठी आपण प्रामाणिक राहू शकतो कारण ते आपल्या हातात असते, पण समोरच्याला आपण प्रामाणिक राहण्यास भाग पाडू शकत नाही . याचे कारण त्याची मैत्री ही त्याची गरज आहे का प्रेम ? हे आपल्याला कधीच निश्चित करता येत नाही, त्यामुळे जीवनात अनेक मित्र येत आसतात आणि जात असतात , ही ये जा गरजे पूरत्यांची असते पण ज्याचे आपल्यावर प्रेम असते तो एकदा जीवनात आला की परत कधीच जात नाही, अगदी मरण आले तरी.

छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र कवी कलश एकदा जीवनात आला, संभाजीराजांइतकेच वेदनादायी मरण स्वीकारले पण त्यांच्या जीवनातून गेला नाही . औरंगजेबाने खान मियॉं खान याला संभाजीराजांच्या डोळ्यात तापलेल्या सळया खुपसायला सांगितल्या, त्याने संभाजीराजांच्या जवळ जाऊन त्या सळया स्वतःच्या पोटात खुपसून जीवन संपविले , पण संभाजीराजांना हात लावला नाही. ही खरी  मैत्री  आहे, आपल्या संपूर्ण जीवनात असा एकजरी मित्र आपल्याला लाभला तरी जीवन सफल झाले म्हणून समजा.

आपण स्वतः मित्र बनल्याशिवाय अशी मैत्री शक्य होत नाही, आपण ही अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवण्यापूर्वी आपल्यात मित्र अवतरला पाहिजे. हे आपण मित्र बनणे म्हणजे निरपेक्ष प्रेम करायला शिकणे .

ज्या प्रेमात अपेक्षा असते ते खरे प्रेमच नसते तर तो फक्त व्यवहार असतो आणि व्यवहार फक्त फायदा तोट्याच्या विचारावर चालतो, तेथे प्रेमाचे स्थान शून्य असते . निरपेक्ष प्रेम आणि भावना कधीच धोका देत नाही. आपल्याला मित्राकडून कोणतीच अपेक्षा नाही, ही अवस्था  जोपर्यंत आपल्यात तयार होत नाही तोपर्यंत आपण कोणाचेही मित्र होऊच शकत नाही आणि आपलाही कोणी मित्र होऊ शकत नाही.

मैत्री निर्माण करण्याचे आणि टिकविण्याचे हे एक रामबाण सूत्र आहे . यात आपण यशस्वी झालो की दुसरे सूत्र असे आहे की आपण त्याच्यात गुंतले नाही पाहिजे. आपले मित्रात गुंतणे बंधने निर्माण करते आणि कोणतेच बंधन सुखकारक नसते, त्यामुळे ते झुगारूनच दिले जाते.

मैत्री मोकळी ढाकळी असावी त्यात कोणताच बांध अथवा बंध नसावा . मित्राला शिव्या देताना आणि त्याने आपल्याला शिव्या देतानासुध्दा आनंदच वाटला पाहिजे ! हे मोकळ्या ढाकळ्या मैत्रीचे खरे लक्षण आहे आणि हीच मैत्री सुखकारक आणि टिकणारी असते. त्याला काय वाटेल ? हा प्रश्न मनात आला की बंधन आले , ते टिकवता येत नाही आणि अशा पातळीवरची मैत्री अंतिम क्षणाची वाट पहात असते . मी काहीही करू देत त्याला काहीच वाटणार नाही, हा खरा विश्वास असतो आणि ही खरी मनमोकळी मैत्री असते जी कधीच तुटत नाही.

मैत्री ही ज्यावेळी आपली कमजोरी बनते, त्यावेळी तिचा गैरफायदाच घेतला जाण्याची शक्यता जास्त असते . मैत्री ज्यावेळी आपली ताकद बनते त्यावेळी आपल्याइतका तिचा फायदा कोणालाच होत नाही . मैत्रीला आपली ताकद बनवा, कमजोरी  नाही !

डॉ . आसबे ल.म.

Leave a comment