फुलांचे गाव

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
फुलांचे गाव | fulanche gaon book

फुलांचे गाव –

केवळ एका पुस्तकाच्या बळावर साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणं हे केवळ अशक्यप्राय. अर्थात ही किमया विलास मोहिते यांच्या ‘फुलांचे गाव’ या पुस्तकानं साधली आहे. कदाचित बहुतेकांना या पुस्तकाचं नाव ठाऊकही नसेल, ना लेखकाचंही. अर्थात हे स्वाभाविकही आहे.

विलास मोहिते यांच्या नावावर केवळ हा एकच कथासंग्रह आहे.1992 मध्ये तो प्रसिद्ध झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे सोलापूरच्या भैरुरतन दमाणी प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठित पुरस्कारासह पाच पुरस्कार या पुस्तकाला मिळाले. विलास मोहिते हे पोलिसी सेवेतले. अधीक्षक पदावरून ते निवृत्त झाले. पुढं काही वर्षांनी ते निवर्तले. धावपळीच्या, गुंतागुंतीच्या क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांनी ‘सत्यकथा’सारख्या दर्जेदार मासिकात विपुल लेखन केलं.

‘फुलांचे गाव’ हा कथासंग्रह ही त्यांच्या साहित्यिक प्रतिभेची निशाणी. बाबा कदम यांनी त्यांच्या कथा कलात्मक, कसदार अन् जीवनानुभूती व्यक्त करणाऱ्या असल्याचं म्हंटलं. विश्राम बेडेकरांकरापासून शंकर सारडांपर्यंतच्या समीक्षकांनीही त्यांच्या लेखनाचं कोैतुक केलं. इंदिरा संत यांनी त्यांच्या कथा धुक्यासारख्या पारदर्शक अन् नाजूक असल्याचं सांगितलं. मंगेश पाडगावकरांनीही त्यांचा उल्लेख माझा आवडता लेखक असा केला आहे.

स्त्री- पुरूष नात्यातले अलगदपणे उलगडलेले हळवे, पण अव्यक्त, अस्फुट भावबंध हे त्यांच्या कथावास्तूचं मुख्य अंग. मानवी मनाच्या तळाची उकल शोधणं हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्यं. या गुणांवरच ‘फुलांचे गाव’ आजही ताजं, टवटवीत आहे. त्याचं गंध भारलेपण कायम आहे. या ‘फुलांच्या गावा’शी माझंही नातं जडलं गेलं आहे. 27 वर्षापूर्वी एका सह्दयानं मला ते भेट दिलं. दुदैव असं, की ती व्यक्तीही आता हयात नाही. मात्र पुस्तकाशी तिची आठवण कायम जोडली गेली.

मध्येच एकदा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये मला विलास मोहिते यांचा संपर्क क्रमांक मिळाला. मी त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांना आनंद झाला. त्यांनी विचारपूस केली. नागठाणे, अतीत, काशीळ या गावांची नावंही सांगितली. नागठाण्यातल्या बेंद्रे नावाच्या आपल्या मित्राचा उल्लेखही केला.

अलीकडचं कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘एफबी पोस्ट’मुळं ते गेल्याचं कळलं. जाताना मात्र वाचकांसाठी सदैव दरवळणारा ‘फुलांचा गाव’ मागं सोडून गेले, हेही तितकंच खरंच!

पुस्तकाचं नाव। फुलांचे गाव
लेखक। विलास मोहिते
प्रकाशन। इंद्रजित प्रकाशन
पृष्ठसंख्या। 111
किंमत। 50 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

1 Comment