चांगली माणसे

bhampak-banner

चांगली माणसे –

आपल्याला भेटलेला माणूस चांगला आहे की वाईट आहे⁉️ हे अनुभवाशिवाय कळत नाही. खरेतर आपली प्रत्येकाची इच्छा ही आपल्याला चांगली माणसे भेटावी अशीच असते, परंतु व्यवहारी जीवनात चांगली माणसं खूप कमी आहेत, त्यामुळे इच्छा नसतानाही आपला वाईटाशीच संग जास्त येतो. त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो, मानसिकतेचा आपल्या विचार आणि आचारवर निश्चित परिणाम होतो, म्हणून परमार्थामध्ये आणि अध्यात्मामध्ये सत्संगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्याला वाईटाचा संग जर चुकविता येतच नसेल, तर आपण स्वतःला त्यांच्या भेटीतही सुरक्षित राहण्यासाठी निश्चित काही बदल करावा लागतो. त्यातला पहिला बदल म्हणजे, आपण स्वतः चांगले आहोत का⁉️ याची नित्य तपासणी करण्याची आपल्याला सवय असावी.

आपल्यातील वाईट गोष्टी या सवयीमुळे आपोआप त्यागल्या जातात आणि चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात. आपण चांगले आहोत याची खात्री झाली की मग त्या चांगल्याच्या सुरक्षेची योग्य काळजी आपण घेत आहोत का⁉️ आणि त्याची सुरक्षा करण्यासाठी आपल्या हातात योग्य शास्त्र आहे का⁉️ आपल्यातील चांगल्याची ओळख पटली की त्याला असलेला धोका कोणता⁉️  याचा शोध आपोआप लागतो. एकदा शत्रू समजला की त्याच्या कुवतीनुसार शस्त्र शोधले जाते आणि त्याच्या योग्य वापरही केला जातो.

आपल्यातील चांगल्याचा खरा शत्रू, हा वाईटाचा संग हाच आहे. आपल्याला तो टाळता येत नाही, परंतु त्याचा आपल्यावर होणारा परिणाम निश्चित टाळता येतो. त्यासाठी जे हत्यार वापरले जाते त्याचे नाव आहे,

शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगी l परावृत्त संगी कामादिका ll
विवेकासहीत वैराग्याचे बळ l धगधगीत ज्वाळा अग्नि जैसा ll
भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी l अलंकारावरी मुकूटमणी ll

आपल्या जीवनात आपण चांगले राहण्यासाठी आणि वाईटाच्या संगतीचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी, शांती, क्षमा, दया, निष्कामता, विवेक वैराग्य, नवविधाभक्ती आणि शुद्ध भाव ही शस्त्रे आहेत. त्यात विवेका सहीत वैराग्य, हे धगधगीत अग्नी सारखे आहे.

जगातील कोणतीही वाईट गोष्ट या अग्नीत जळून खाक होते, म्हणून चांगला बनलेल्या आणि चांगला असलेल्या माणसाभोवती विवेकासहीत वैराग्याचे भक्कम कुंपण असावे, मग आपल्याला वाईट बनविण्याची ताकद जगातील कोणत्याही वाईटात नाही.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment