हंपी: साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य

By Bhampak Travel 2 Min Read

हंपी: साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य

घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसले तरी गतवैभव अनुभवता नक्कीच येते आणि मन सार्थ अभिमान, खूपकाही गमावल्याची वेदना, पराभवाचे दुःख अशा संमिश्र भावनांमध्ये अडकून पडते. आज आपण जातोय तेराव्या शतकाच्या पूर्वाधात.

गेली कित्येक दशके उत्तरेकडे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजांनी विस्तारवादी धोरण स्वीकारले आणि दक्षिण भारतातील राजकीय परिस्थितीत नाट्यमय बदल झाले. होयसाळा, पंड्या, काकतीय, यादव यांसारख्या विद्यमान दक्षिण भारतीय राजांना घरघर लागली असतानाच मुस्लिम आणि संगमांनी स्थापन केलेली अनुक्रमे बहमनी आणि विजयनगर ही दोन शक्तिशाली राज्ये उदयाला येत होती.

हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी हरिहरच्या नेतृत्वाखाली विजयनगर राज्याची स्थापना करत तुगंभद्रेच्या दक्षिण तटावर वसलेल्या हंपीला आपल्या राजधानीचे शहर म्हणून निवडले. रामायणातल्या वानरांच्या राजाची, सुग्रीवाची किष्किंधा नगरी ती हीच. सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋष्यश्रुंग, मातंग, अंजना, माल्यवंत आणि हेमकूट या पाच टेकड्यांच्या कुशीत वसलेली ही हंपी.

बहामनीचा बहामनशाह आणि हरिहर-बुक्क यांच्या राज्यविस्तारासाठी आणि असलेले टिकवण्यासाठी सततच्या लढाया होणे अपरिहार्य होते. १३ व्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्याचा प्रवास संगम वंशाकडून पुढे चौदाव्या शतकात साळूव, तुळूव पर्यंत येत पंधराव्या शतकात कृष्णदेवरायापर्यंत झाला आणि विजयनगर खऱ्या अर्थाने भरभराटीला आले. स्थापत्य, सुबत्ता, चित्रकला, ग्रंथसंपदा, सामरिक शक्ति सगळ्याच स्तरांवर विजयनगर वैभवाच्या शिखरावर होते. कृष्णदेवराय इतका पराक्रमी योद्धा होता की  त्याच्या वाढत्या ताकदीने इतर राजे त्याला रोखायचं कसं या चिंतेत होते.

पुढे तालिकोटच्या लढाईत जरी विजयनगर साम्राज्याचा अंत झाला असला तरी आजही हंपी तितक्याच ताकदीने सतत तीन शतके मुस्लिम आक्रमणांपासून दक्षिणेला वाचवणाऱ्या या हिंदू साम्राज्याच्या देदीप्यमान यशाची साक्ष देत आहे.

Leave a comment