प्रसन्न मन –
प्रसन्न मनाची ताकद सर्वात जास्त आहे. प्रसन्न मन असणारी व्यक्ती संसारातील कोणत्याही दुःखावर आणि संकटावर सहज मात करू शकते. विश्व माऊली ज्ञानदेव म्हणतात –
देखे अखंडित प्रसन्नता l आथी जेथ चित्ता ll तेथे रिघणे नाही समस्ता l संसार दुःखा ll
आज आपल्या कोणाचेही मन प्रसन्न नाही, त्यामुळे किरकोळ गोष्टीचाही खूप मोठा दुष्परिणाम होत आहे. आपले स्वतःचे मन प्रसन्न नाही, त्यामुळे जे आपल्याकडे नाही, ते आपण दुसऱ्यालाही देऊ शकत नाही आणि देतही नाही. दुसर्याची मानसिकता खराब होईल अप्रसन्न होईल, दुःखी होईल, निराश होईल असेच काहीतरी आपण सर्वजण करत आहोत. आजच्या महामारीच्या काळात सर्वजण भयानक भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रत्येकाला मानसिक आधाराची गरज आहे आणि तो द्यायला कोणीही तयार नाही.
प्रत्येक जण परिस्थिती किती भयानक आहे ? याचे अवास्तव वर्णन करण्यात अग्रेसर आहे. याचा परिणाम भीतीच्या आणि दडपणाच्या तसेच नैराश्याच्या वाढीतच होत आहे. आपण सोशल मीडियावर अशी भीतीदायक माहिती पाठवून एक प्रकारचे पापच करत आहोत.
आज कधी नव्हे ते स्मशानभूमीतील जळणाऱ्या प्रेतांचे व्हिडिओ, जाळलेल्या प्रेतांची राख, एका स्मशानभूमीमध्ये किती चीता पेटवलेल्या आहेत आणि रांगेत किती प्रेते आहेत, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. कोविड सेंटरवरती जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या हातात मोबाईल आहे, ते हे पाहत आहेत त्यांची मानसिकता असे व्हिडिओ पाहून काय होत असेल ? याची कल्पना करा. ज्यांच्या घरातील करती माणसे पॉझिटिव्ह आहेत, औषधे मिळवण्यासाठी ती वणवण भटकत आहेत, सोशल मीडिया वरती इंजेक्शन मिळवून देण्यासाठी ते आवाहन करीत आहेत, अशा लोकांच्या हे पाहण्यात हे व्हिडिओ येत आहेत त्यांची अवस्था काय होत असेल ?
आपण असे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती टाकून लाईक मिळण्याची वाट पाहत असाल, तर ते एक घोर पाप आहे, हे कधीच विसरू नका. एखाद्या माणसाला या महामारीच्या काळात धीर देणे, हे महापुण्य आहे आणि याच काळात एखाद्यामध्ये भीती निर्माण करणे हे महापाप आहे.
आज अतिउत्साहाच्या भरात बहुतांशी लोक हे महापाप करीत आहेत. आपण प्रत्येकाने याबाबतीत भानावर यायला हवे. सोशल मीडियावर काही टाकायचे असेलच तर धीर देणारे, मन प्रसन्न होणारे व्हिडिओ टाका आणि माहिती टाका, कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांची व्हिडिओ टाका. जेणेकरून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना धीर येईल.
कोरोनाच्या काळात भक्कम आत्मविश्वास हाच सर्वात प्रभावी उपाय या रोगावर दिसून येत आहे. जो रुग्ण निर्भय आहे, तोच आत्मविश्वासाने भक्कम राहू शकतो. नकळत त्याला धीर देऊन आपण त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत, हे विसरू नका. त्याचे मन प्रसन्न होईल आणि राहील असे काहीतरी आपण करायला हवे. प्रेतांचे फोटो पाहून, चितांचे, जळालेल्या राखेचे फोटो पाहून कोणाचे मन प्रसन्न होईल आणि राहील ? याचा विचार दहा वेळा करा.
शरीर कितीही जर्जर झाले आणि मन प्रसन्न व खंबीर असले, तर त्या मनाच्या खंबीरतेवर कोणत्याही रोगावर यशस्वी मात करता येते. शरीर कितीही तगडे असले आणि मन घाबरले तर जगातील कोणतेही औषध रोगाला मारू व आवरू शकत नाही.
आज कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रोग्यांमध्ये माझ्या मते ७०% मृत्यू हे केवळ भीतीने होत आहेत आणि 30 % मृत्यू हे रोगामुळे होत आहेत. त्यामुळे आजपासून, नव्हे आत्तापासून मी कोणालाही भीती वाटेल, मन निराश होईल, असा एकही प्रेताचा, चितेचा किंवा राखेचा व्हिडिओ किंवा त्या स्वरूपाची माहिती सोशल मीडियावर टाकणार नाही ! अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण करूया ! हेसुद्धा एक आजच्या घडीला महान सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य ठरेल !
मन करा रे प्रसन्न l सर्व सिद्धीचे कारण ll
आपण स्वतःही प्रसन्न राहूया आणि दुसऱ्यालाही प्रसन्नताच वाटूया !
डॉ. आसबे ल.म.