सुट्टी | Holiday

bhampak-banner

सुट्टी | Holiday –

किती सुंदर शब्द आहे ? आपल्या सर्वांचा आवडता. सुट्टी न घेणारे अनेक सापडतील पण ती आवडत नाही असा माणूस जगात शोधून सापडणार नाही . आपल्या विश्रांतीचा दिवस आणि नवी उमेद निर्माण करणारा दिवस हाच आहे.

आपल्याला आपल्या मनासारखे जगण्याचा हाच एक दिवस आहे, म्हणून जगातील प्रत्येक देशात, संस्कृतीत, धर्मात सुट्टीचा दिवस आहे . सुट्टी घेताच येत नसणारी माणसे खरोखरच दुर्दैवी आहेत . जबाबदारीचे ओझे डोक्यावर असेल तर सुट्टी घेतली तरी विश्रांती मिळत नाही. अविश्रांत काम करणारी माणसे यशस्वी जरूर होतात, पण सुखी होतातच असे नाही. सुखाचे क्षण वेचावे लागतात, ते जीवनाच्या मार्गावर विखूरलेले असतात, ते गोळा करायला थोडे थांबावे लागते, हे थांबणे म्हणजेच सुट्टी आहे .

आज मोबाईल युगात संवाद संपलेली माणसे एकलकोंडी होत चालली आहेत. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी आपण अविश्रांत काम करत आहोत , पण हे करताना आपण त्यांच्या आणि आपल्या मानसिक गरजा पूर्ण दुर्लक्षित करत आहोत. याचा परिणाम मानसिक विकार निर्माण होत आहेत . सुट्टीचा पुरेपूर उपभोग खरा उपयोग हा यावर एक रामबाण उपाय ठरू शकतो. सतत कार्यरत असलेले धातूचे मशीनही झीजल्याशिवाय रहात नाही. आपले शरीर तर हाडामांसाचे आहे, याला विश्रांती नाही दिली तर ते अवेळी झीजणार आहे .

आपण सुट्टी घेणार नाही म्हणूनच निसर्गाने रात्र निर्माण केलेली आहे . रात्रीचा दिवस करणाऱ्या माणसाला रात्रीच्या विश्रांतीची किंमत कळणार नाही .

तुका म्हणे पुढा ।
घाणा जुंतू जैसी मूढा ।।

सतत कार्यरत असणाऱ्या माणसाने किमान कामात थोडा बदल करावा किंवा ज्या कृतीने मन प्रसन्न होईल आणि शरीर ताजेतवाने होईल अशी कोणतीही कृती करावी, मग ते वाचन असेल, श्रवण असेल, लेखन असेल, भ्रमंती, वादन, नर्तन किंवा एखादा खेळ असेल. मन प्रसन्न करणारी आणि शरीराला ताजतवाने करणारी कोणतीही कृती ही विश्रांतीच/Rest असते आणि सतत कार्यक्षम असणाऱ्या माणसाला ती सुट्टीच/Holiday असते.

छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज हे शिकार करण्यासाठी वेळ राखीव ठेवत होते. ॲडॉल्फ हिटलर बर्चेस गार्डन येथे आपली मैत्रीण इव्हा ब्राऊबरोबर सुट्टीतील वेळ राखीव ठेवत होता. आयुष्यात गेलेली वेळ परत येत नाही आणि वयही परत येत नाही. कर्तव्य आणि जबाबदारी सोडता येत नाही आणि येणारही नाही पण याच मार्गावरील सुखाचे क्षण अनमोल आहेत, त्यांना वगळून पुढे जाण्यात काहीच मजा नाही .

सुट्टी या क्षणासाठी आहे तिची मजा लुटता आली पाहिजे. हे सर्व कार्यक्षम माणसासाठी आहे, जे निष्क्रिय आहेत, त्यांनी याचा फारसा विचार करू नये.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment