माणूसकी | Humanity

By Bhampak Laxman Asbe Articles Lifestyle 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

माणूसकी | Humanity –

आपल्या जीवनातील माणुसकी आणि मानवता ही आपल्या अंतःकरणातील समतेवर अवलंबून असते. जोपर्यंत आपल्या जीवनातील विषमता संपत नाही तोपर्यंत आपण समतेत येत नाही. आपण विषमतेत आहोत हेच आपल्याला लवकर समजत नाही कारण आपल्याभोवती बहुतांशी विषम अवस्थेत असलेली माणसेच वावरत असतात.(माणूसकी | Humanity)

समोरचा व्यक्ती आणि मी यात कोणताच भेद नाही, हे वाक्य वाचायला, ऐकायला आणि बोलायला सोपे असते, परंतु अनुभवायला अतिशय अवघड असते. जोपर्यंत हा समभाव आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीबद्दल मनापासून आपलेपणाने वागू शकत नाही. विषम अवस्थेत असतानाही आपल्याला एखाद्याबद्दल आपुलकी वाटत असेल, तर त्या आपुलकीच्या पाठीमागे आपली गरज प्रधान असते.

मी कोणीतरी वेगळा आहे आणि समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा वेगळी आहे, म्हणजेच माझ्यासारखी नाही. हीच भावना व्यवहारी जगात दृढ असते आणि ही भावनाच माणसाला अहंकारी बनविते.

एकदा अहंकार  चिकटला की तो इतका चिकट आणि चिवट असतो, की मरेपर्यंत तो सुटत नाही. विषमतेचे सर्वात विकृत फळ, हा अहंकार आहे आणि समतेचे सर्वात सुंदर फळ म्हणजे जिव्हाळा आणि आपुलकी आहे. आपल्या माणुसकीची खरी परीक्षा जिव्हाळा आणि आपुलकी याच्यावरच ठरत असते. देहभावना किंवा देही अवस्था ही विषमतेला जन्माला घालते कारण जगातील कोणतेही दोन देह समान नाहीत.

अहंकार हा नेहमी देहाभिमानातूनच निर्माण होत असतो. आपल्या जीवनात खरी माणुसकी अनुभवायची असेल, तर आपल्यातून देहाभिमान आणि अहंकार यांचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. हे शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर केवळ अशक्य आहे. यांचे समूळ उच्चाटन हे फक्त आत्मिक पातळीवरच शक्य आहे.

या विश्वात फक्त आत्मिक पातळीवरच समता आहे . जगातील सर्व भेद फक्त आत्मिक पातळीवरच संपविता येतात. आत्मिक पातळी आत्मज्ञानाशिवाय समजत नाही आणि आत्मज्ञान गुरूकृपेशिवाय होत नाही. आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला देहाभिमान रहात नाही. जेथे देहाभिमान नाही, तेथे भेद उरत नाही.

अभेद  वृ त्ती हीच समता आहे आणि हीच माणुसकी आहे. आपल्या जीवनातील माणुसकी या पातळीवर तपासून पहा, मग आपण माणूस आहोत का⁉️ या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, यालाच माणुसकी म्हणतात. हे वाचायला सोपे आहे, कळायला अवघड आहे आणि वळायला तर अतिशय अवघड आहे.

– डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment