हुतात्मा आणि गांधीजी

By Team Bhampak Articles 2 Min Read
हुतात्मा आणि गांधीजी

हुतात्मा आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बोंब फ़ेकला म्हणून नाही तर सेंडर्स च्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस फ़ाशीची शिक्षा देण्यात आली – २३ मार्च, १९३१ रोजी .

महात्मा गांधींना या संदर्भात लक्ष्य करण्यात आलं. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फ़ाशीच्या शिक्षेतुन सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हाइसरोय लोर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होइल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असुनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा अघोरी कार्यक्रम उरकुन घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंग संबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.”

या तीन वीरांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर यंग इंडीया मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

थोडक्यात, रूढ अर्थाने माहित असलेले क्रांतिकारक आणि महात्मा गांधींसारखा अद्वितीय क्रांतिकारक यांच्यामधील संबंधांचा विचार करताना तो सर्वंकष असला पाहिजे.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment