स्वभावाची  स्वच्छता

bhampak-banner

स्वभावाची  स्वच्छता –

आपल्या स्वतःच्या स्वभावातील दोष शक्यतो लवकर माणसाच्या लक्षात येत नाहीत. आपल्या जवळची माणसे आपल्यावर प्रेम करत असल्यामुळे, त्या दोषांकडे दुर्लक्ष करतात आणि परकी माणसे त्यात त्यांचे काहीच नुकसान नसल्यामुळे दुर्लक्ष करतात.

आपल्यावर सर्वात जास्त लक्ष, आपल्यावर जळणाऱ्या, आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या, आपल्याशी इर्षा व मत्सर करणाऱ्या माणसाचे असते. ही आपल्या भोवतालची माणसे, आपल्यात दोष शोधत असतात, त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. त्यांच्या निदर्शनाला आलेला दोष खरा असतो कारण त्या दोषाचे भांडवल करूनच आपल्याला ते बदनाम करत असतात.

तुकोबारायांनी निंदकाचे घर असावे शेजारी l असे जे म्हटले आहे, त्यामध्ये अतिशय गूढ अर्थ आहे. आपली मानसिकता, निंदा करणाऱ्या माणसाला टाळणारी असते आणि त्याची संगत किंवा शेजार आपल्याला कधीच हवासा वाटत नाही. तूकोबारायांच्या दूरदृष्टीतून पाहिले, तर वर वर्णन केलेली सगळी माणसे आपली निंदा करणारी असतात.

कोणतीही निंदा करण्यासाठी दोष शोधावा लागतो, त्याशिवाय ती करता येत नाही, म्हणून नेहमी निंदा करणारा काय बोलतोय⁉️ त्याच्याऐवजी तो कशा विषयी बोलतोय ⁉️ याकडे आपले लक्ष असावे.

दासबोधात समर्थ सांगतात, माणसाच्या स्वभावातील दोषच त्याच्या जीवनातील येणाऱ्या संकटाचे कारण असतात. आपल्या जीवनात संकट आणि अडचण येऊ नये, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी तो आयुष्यभर प्रयत्न करत असतो, निकराची लढाई देत असतो, परंतु आयुष्यातील सर्व संकटाचा पराभव करणे त्यांना शक्य होत नाही. याचे कारण संकट किंवा अडचणी ज्या कारणाने तयार होत असते, ते कारण आपण बाहेर शोधत असतो.

आपल्या स्वभावातील दोष आपल्याकडून नेहमी दुर्लक्षित होतो, म्हणूनच तो संपत नाही, म्हणूनच संकटे आणि अडचणी संपत नाहीत. आपल्या स्वतःच्या स्वभावातील दोष, आपल्या स्वतःला काढण्यासाठी अंतर्मुख होऊन, स्वतःचे परीक्षण करावे लागते. माणूस नेहमी दुसऱ्याचे परीक्षण करतो, त्यामुळे त्याला दुसऱ्यातील दोष दिसतात. आपण स्वतः स्वभावाने निर्दोष असल्याशिवाय दुसऱ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही, सेवा करू शकत नाही आणि परोपकारही करू शकत नाही.

या तिन्ही क्षेत्रातील सदोष सेवा आपल्याला केलेल्या कामाचे समाधान मिळू देत नाही. आपण ज्या दिवशी दुसऱ्याचे दोष शोधणे बंद करू, त्याच दिवशी आपण स्वतःतील दोष शोधायला सुरुवात करतो. ही प्रक्रिया मन शुद्धिची आहे, चित्त शुध्दीची आहे, अंतःकरण शुद्धीची आहे आणि अंतिमतः आत्मशुद्धीची आहे, या प्रक्रियेसाठी जीवनात साधना असावी. साधनेशिवाय या मार्गावर आपले पाऊलही पडू शकत नाही. याचा अर्थ साधना जीवनात नसेल, तर आपल्या स्वभावातील दोष जगातील कोणत्याही उपायाने संपविता येत नाहीत, त्याला कोणतेही औषध उपलब्ध नाही आणि पुढेही होणार नाही.

संग सज्जनाचा उच्चार नामाचा l

घोष कीर्तनाचा अहर्निशी ll

तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे l

तोच ज्ञान लाहे गु रु कृ पा ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment