सध्या मी प्रेमात पडलोय!

bhampak post

सध्या मी प्रेमात पडलोय!

सध्या मी प्रेमात पडलोय. कुणाच्या?… ते योग्य वेळ आली म्हणजे सांगेल. तूर्तास संदर्भ म्हणून इतकेच पुरे. बरे प्रेमात पडल्यावर जर सगळ्यात जास्त फायदा कुणाचा असेल तर तो असतो मोबाईल कंपन्यांचा. अगदी तासंतास फोन चालू असतो. पण दिवसा ऑफिस आणि संध्याकाळी टीव्ही यामुळे फोन करणार तरी कधी? रात्री… मस्त गार हवेत गच्चीवर इकडून तिकडे फेऱ्या मारत फोनवर आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्याची मजाच काही और असते. अर्थात ही मजा घेणे आजकाल अनेकांना जमत नाही. कारण रेंजचे बारा वाजलेले असतात. त्यापेक्षा रात्री बारा नंतर फेसबुकवरील चाटचा गप्पा मारण्यासाठी उपयोग करायचा. खूप फायदे असतात हो त्याचे… शप्पथ… म्हणजे बघा… बोलून बोलून तोंडही दुखत नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोठ्यात मोठा आशय व्यक्त करण्यासाठी फक्त एक स्माईलीही पुरेशी ठरू शकते. आता इतके सगळे फायदे म्हटल्यावर कोण कशाला फोन करायच्या फंदात पडेल? पण तरीही जी मजा फोनवर प्रत्यक्ष बोलण्यात असते ना; ती चाटमध्ये नाही येत हो… शेवटी ठरवले, आपण असा एखादा फोन घ्यावा; ज्यावर आपल्याला सलग बोलता येईल. त्यासाठी सध्या तरी landline उपयोगी ठरतो. मग काय… लावला नंबर BSNL फोनसाठी. ते बिचारे खूप चांगले हो… ३ दिवसात त्यांनी कनेक्शन जोडून दिले. पण त्यांच्याकडे फोनचा डब्बा उपलब्ध नसल्यामुळे तो बाहेरूनच घ्यायला सांगितला.

आता बाहेरून डब्बा घ्यायचा म्हणजे परत खर्च… घरात एक जुना डब्बा पडलेला होता. शोधून काढला आणि कनेक्शन चालू झाले. आता धूळ खात पडल्यामुळे त्या फोनची बटने थोडी खराब झालेली आहेत पण जीव खाऊन बटन दाबले तर मात्र नंबर लागतो. त्या डब्याचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे त्यात कॉलरआयडी दिसत नाही. जाऊ द्या… काय फरक पडतो त्याने… आपण कुठे कुणाचे पैसे थकवले आहेत ज्यामुळे आपल्याला फोन उचलण्यात काही प्रॉब्लेम असेल? बाकी आपणही नंबर लावताना कधी तरी चुकतो का? शक्यच नाही…

काल रात्रीही आम्ही म्हणजे मी आणि ती, फेसबुकवर चाटिंग करत बसलो होतो. रात्रीचे अडीच वाजले असतील. तिच्या कडील नेटवर्क खूप स्लो होते. त्यामुळे माझे मेसेज तिला आणि तिचे मेसेज मला बऱ्याच उशिराने मिळत होते. साला आपल्या देशातील इंटरनेट सर्विस खरंच खूप वीक आहे. शेवटी ती वैतागली आणि तिने मला माझ्या मोबाईलवर फोन केला. पण मोबाईलवरही आवाज नीट ऐकू येत नव्हता. एकतर रात्र असल्यामुळे तिला एकदम हळू आवाजात बोलावे लागत होते आणि मध्येच ऐन वेळेवर रेंज तुटत होती.

“थांब गं… माझ्या नवीन नंबर वरून तुला फोन लावतो…” मी फोनवर तिला सांगितले आणि फोन कट केला. मनात धाकधूक होतीच. फोनच्या डब्ब्याचे सगळे बटन नीट काम करतात की नाही हेही चेक करायचे होते. मग सगळ्यात पहिल्यांदा माझाच मोबाईल नंबर डायल केला आणि चक्क मला रिंग आली हो. म्हणजे माझा फोनचा डब्बा व्यवस्थित काम करत होता. लगेच तिचा नंबर मोबाईलवर वाचला आणि BSNLच्या डब्ब्यावरून तो डायल केला. तिकडे रिंग वाजलेली ऐकू आली. चला फोन तर लागला. पण एरवी तिसऱ्या चौथ्या रिंगला फोन उचलणारी ती आज ७/८ रिंगा वाजूनही फोन घेत नव्हती. आणि तेही अगदी फोन हातात असताना? बहुतेक माझी मस्करी करण्याची तिला परत हुक्की आली असावी. हो.. कधी कधी ती मुद्दाम असे करते. इतक्यात फोन उचलला गेला.

“हेल्लो !!!” कुणा पुरुषाचा आवाज आला. अगदी झोपेतून उठलेला वाटत होता. आता काय बोलावे हेच मला सुचेना.

“ए… इतक्या रात्री फोन करतोस तर गप्पं का बसतोस? बोल…” पलीकडील आवाजात वैताग दिसत होता. च्यायला… तिच्या वडिलांनी फोन घेतला की काय? रिंग वाजल्यामुळे इतर कुणी उठून आपण पकडले जाऊ नये, यासाठी तिने झोपण्याचे नाटक केले असावे आणि फोन तिच्या वडिलांनी घेतला असावा.

“आता बोलतो की मी पोलिसांना फोन लावू ?” त्यानी सरळ धमकीच दिली. पोलीस म्हटले की आपली गाळण उडते. आता बोलणे भागच होते.

“xxx ला फोन द्या…” मी बिचकत बिचकत सांगितले.

“मायला तुझ्या… तिचे घराबाहेर जाणे बंद केले तर तू रात्री अडीच वाजता फोन करायला लागलास?” तिचे वडील भडकले. ज्या अर्थी तिचे नांव घेतल्यावर त्यांनी असे उत्तर दिले म्हणजे पलीकडे तिचे वडीलच होते ही खात्री पटली. मी गच्च डोळे मिटून घेतले. जे काही तिचे वडील बोलतील ते फक्त ऐकून घ्यायचे… उलट उत्तरे द्यायचे नाहीत हे मी मनाशी पक्के ठरवले.

“ए… अगं उठ… आपली पोरगी पहा काय गुल खिलवते आहे. आता तिला रात्री अपरात्री फोन यायला लागलेत…” तिचे वडिल तिच्या आईला उठवत होते. मनात म्हटले… “च्यायला… लफडं वाढतच चाललं…” मी फक्त फोनवर ऐकत होतो आणि त्यांचे संवाद सुरु झाले. फोन चालू असल्यामुळे मला ते अगदी स्पष्ट ऐकू येत होते.

“काये???” तिच्या आईचा वैतागलेला आवाज आला.

“अगं आपली कार्टी पहा काय गुण उधळते आहे ते… तुझ्या सांगण्यावरून मी तिचे घराबाहेर जाणे बंद केले तर तिला रात्री अपरात्री फोन यायला लागले…” तिचे वडील चिडले होते. मी विचारात पडलो… च्यायला… आमच्या प्रेमाला तर त्यांनी स्वतः परवानगी दिली असताना मग तिचे घराबाहेर पडणे का बरे बंद करावे?

“पाहू कुठाय तो फोन… मीच बोलते त्याच्याशी…” तिच्या आईने नवऱ्याच्या हातातून फोन घेतला…

“अहो… हा तर तुमचाच फोन? मग यावर कसा काय त्याने फोन केला?” तिच्या आईला आश्चर्य वाटले.

“अरे हो… खरंच की… म्हणजे आपल्याला संशय येवू नये म्हणून त्याला माझा नंबर दिला कार्टीने आणि वरून कधी फोन करायचा हेही सांगितले… बरीच डँबीस झाली की आपली पोरगी…” तिचे वडील चाट पडलेले मला फोनवरही लक्षात आले.

“थांबा… उठवा तिला… आधी उठवा… आता काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू…” आता मात्र तिच्या आईने चंडिचा अवतार धारण केला. मी आपला फक्त फोनवर ऐकत होतो. तेवढ्यात परत माझ्या मोबाईलची रिंग वाजली. इतक्या रात्री कुणाचा फोन आला म्हणून पाहिले तर तिचाच नंबर. आयला… हे कसे शक्य आहे? मी तर अजून फोन कटही केला नाही आणि तरी माझ्या मोबाईलवर तिने कसा काय फोन केला? मी पुरता बावचळलो. घाई घाईत मोबाईल रिसीव्ह केला.

“हेल्लो…” मी म्हणालो खरे पण तिने मला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही…

“काय रे… बंडलबाज, चिकटगुंडा… जुगाडू कुठला… कधीची वाट पाहते आहे मी तुझ्या फोनची…” ती भडकली होती. आता काय बोलावे हेच मला समजेना. इकडे ‘ही’ भडकलेली… तिकडे ‘ती’ भडकलेली… दोन्ही फोन माझ्या दोन कानांना आणि त्यावर दोन्हीकडून मारा होत होता. त्यावेळेस माझा चेहरा कुणी पाहिला असता ना तर शप्पथ सांगतो… ओळखले नसते मला कुणी… बरे आता मोबाईल कट करावा तर ही अजूनच भडकेल आणि फोन कट करावा तर बिचाऱ्या एका निष्पाप मुलीला उगाचच मार खावा लागेल. बरे त्या निष्पाप मुलीचा जर काही दोष असेल तर तो फक्त इतकाच की दोघींचे नांव एकच होते. शेवटी एक निर्णय घेतला.

“xxx थांब… तुला मी थोड्या वेळात फोन करतो. आता माझा विदेशातील client दुसऱ्या लाईनवर आहे.” शप्पथ सांगतो… माझ्या व्यवसायात ही एक थाप खूप मोलाचे काम करते. तिने लगेच फोन कट केला. अर्थात परत मी फोन करेल त्यावेळेस शिव्या खाव्याच लागणार होत्या पण ते सांभाळून घेता येणार होते…

“हेल्लो… हेल्लो…” मी फोनवर सुरुवात केली.

“ए तू थांब रे.” त्या माणसाचा आवाज आला.

“साहेब… माझे जरा ऐकून घ्या… चुकून रॉंग नंबर लागला माझ्याकडून आणि माझ्या होणाऱ्या बायकोचे नाव आणि तुमच्या मुलीचे नांव एकच असल्यामुळे गोंधळ झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो…” अगदी एका दमात मी सगळे सांगून टाकले. पलीकडील माणसालाही बहुतेक ते पटले असावे आणि त्याने फोन कट केला. त्यानंतर मी माझ्या हिरोईनला परत फोन लावला… यावेळेस मात्र तो अगदी बरोबर लागला होता. कशावरून? अहो तिने फोनवर दिलेल्या शिव्या मला अजूनही आठवताहेत…

यावरून काय धडा मिळतो? दोन पैसे गेले तर हरकत नाही पण फोन कॉलरआयडीच हवा…

जुगाडू नाशिककर, मिलिंद जोशी..

Leave a comment